सुनील पाटील, जळगाव
जळगाव : संजय राऊंत यांच्या जीभेला हाड नाही, तोंडाला लगाम नाही. ते बेछूट सुटलेले आहेत. रोज सकाळी उठून कोणाला शिव्या घालतील, कोणाला काय बोलतील याचा नेम नाही अशा शब्दात वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात खासदार संजय राऊत यांच्यावर टिका केली. कसब्याची एक जागा जिंकली म्हणजे तीर मारला असे समजण्याचे कारण नाही. आता जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिकांच्या निवडणूका आहेत तेथे काय दिवे लावतात ते शिवसेनेने दाखवावे, असे आव्हानही महाजन यांनी राऊतांसह महाविकास आघाडीला दिले.
पुण्यातील कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकित कॉग्रेसचा विजय तर भाजपचा पराभव झाला आहे. या निकालावर खासदार संजय राऊत यांनी ‘कसबा अभी झाली है, महाराष्ट्र अभी बाकी है’ असे म्हटले होते. त्याला गिरीश महाजन यांनी शनिवारी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात प्रत्युत्तर दिले. खरे तर राज्यात शिवसेनेचा सुपडा साफ झालेला आहे. तीन राज्यात भाजप वेगाने पुढे आले. मोदींच्या नेतृत्वात शिक्कामोर्तब झालेला आहे. त्याचं त्यांना घेणं देणं नाही. एक जागा थोड्या मताने निवडून आली तर त्यांना झाकी, बाकी दिसायला लागली. आता जिल्हा परिषद, नगरपालिका महापालिकांच्या निवडणूका आहेत. तेथे शिवसेना काय दिवे लावते ते त्यांनी दाखवावे. कसब्यात निसटता पराभव झाला आहे, तो मान्य करावा लागेल. आपण स्वत: त्या ठिकाणी होतो. या निवडणुकीत दडपशाही केल्याचा आरोप निराधार आहे.असे आरोप होतच असतात, दडपशाही राहिली असती तर निकाल वेगळा लागला असता असेही महाजन म्हणाले.