प्रशांत भदाणे
जळगाव - स्वतः ला वाघ म्हणणारे धमकीला काय घाबरता? मी वाघ आहे... मी वाघ आहे... असं संजय राऊत नेहमी म्हणतात, मग दात काढलेला वाघ आहे काय, अशा शब्दात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलंय. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा परिषदेत संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर गुलाबराव पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं.
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लोकमतच्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी सत्तानाट्याच्या घडामोडी सुरू होण्याच्या एक महिना आधी एकनाथ शिंदे यांना तुम्ही बंडखोरीच्या विचारात आहात का? अशी विचारणा केल्याचा गौप्यस्फोट केला होता. यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता गुलाबराव पाटील म्हणाले की, आठ महिन्यांनी त्यांना साक्षात्कार झाला असेल तर मला माहिती नाही. आता सात ते आठ महिने झाले, त्यामुळे त्या गोष्टीला महत्त्व नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन 210 दिवस झाले आहेत. त्यामुळे त्या गोष्टीला महत्त्व नाही, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
गद्दार गद्दार ऐकून लोक कंटाळले...
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, हे बघा एकवेळ पिक्चर लागून सात महिने झाल्यानंतर त्याला महत्त्व नसतं. गद्दार गद्दार हे ऐकून लोकही आता बोअर झाले आहेत. तुम्हाला काय मिळालंय, नाही मिळालंय, लोकांनी काय गद्दारी केली हे आता सगळं संपलंय. त्यांनी आता नवीन उभारीने पक्ष बांधला पाहिजे आणि आम्हाला चितपट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी निवडणुकीला आणि निवडून यायला महत्त्व आहे. तुम्ही तुमचे लोक निवडून आणा, आम्ही निवडून येण्याचा प्रयत्न करू. आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करा, असं थेट आव्हान देखील गुलाबरावांनी आदित्य ठाकरेंना दिलं.
कोर्टाच्या निर्णयावर मांडलं मत...
हायकोर्टाने ठाकरे गटाची शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतची याचिका फेटाळून लावली, यावर पण त्यांनी मत मांडलं. ते म्हणाले, "मागच्या काळातील दाखले देऊन कोर्टाने हा निर्णय दिला आहे. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचा जर विचार केला तर मुलायमसिंह यादव यांच्या मुलाला सायकल चिन्ह मिळालं होतं. तीच पुनरावृत्ती कोर्टाने याठिकाणी केलीय", असे त्यांनी सांगितले.