-विलास झंवर
पाळधी (जि. जळगाव) : संजय राऊत हे आमच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान राज्याचे ग्रामीण पुरवठा मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त पाळधी (ता. धरणगाव) येथे सोमवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, सध्याचे राजकारण फार गढूळ झाले आहे. संजय राऊत यांना आम्ही चाळीस लोकांनी मतदान केले नसते तर ते निवडून आले नसते, असा टोलाही त्यांनी मारला.
पाळधी गावासाठी २२ कोटी रुपयांची पाणीयोजना पूर्ण झाली आहे. त्याची सोमवारी चाचणी झाली. पुढील महिन्यापासून पाळधीत रोज पाणीपुरवठा होईल, तसेच धरणगावचाही पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होईल. तेथील काम युद्धपातळीवर सुरू आहे. धरणगावात पाण्यासाठी मोर्चा काढणाऱ्यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळात काय केले, असा सवालही त्यांनी केला.
आता शिवसेना -भाजपचे लव्ह मॅरेज झाले असून आमचा मतदानाचा टक्का वाढणार असल्याचे ते म्हणाले. सभेस आमदार संजय रायमुलकर, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, भाजपचे सुभाष पाटील, संजय महाजन आदींनी मार्गदर्शन केले. सभेला नागरिकांची उपस्थिती फार मोठ्या प्रमाणात होती.