अमळनेर,दि.28- प्रतिपंढरपूर असलेल्या संत सखाराम महाराज यात्रोत्सवाचे मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी अक्षय तृतीयेच्या महुर्तावर स्तंभारोपण व ध्वजारोहण करण्यात आले.
शुक्रवारी पहाटे वाडी संस्थानमध्ये विठ्ठल-रूख्माईची विशेष पूजा करण्यात आली. पांडुरंगाला सोन्याची पगडी चढविण्यात आली. त्यानंतर वाडी मंदिराच्या सभामंडपातून संस्थानचे 11 वे गादीपुरूष हभप प्रसाद महाराज हे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बोरी नदीपात्रात आले.
सुरुवातीला अन्नपूर्णाचे स्तंभारोपण करण्यात आले.त्यानंतर बोरी नदी पात्रात असलेल्या मूळ संत सखाराम महाराजांच्या समाधी समोर अक्षय महूर्तावर श्रीगणेश व स्तंभाची पूजा अभय देव यांनी केल्यानंतर स्तंभारोपण करण्यात आले. यावेळी जयदेव, केशव पुराणिक,चारूदत्त जोशी, सारंग पाठक, मिलिंद उपासणी यांनी पौराहित्य केले. मंदिराच्या कळसावर ध्वज प्रल्हाद महाराजांच्या समाधी मंदिराच्या कळसावर भास्कर नामदेव भावसार, प्रशांत भावसार यांनी भगवाध्वज लावला.