अमळनेर : यंदा कोरोनाच्या भीतीमुळे आणि शासनाच्या विदेशी व अनधिकृत फटाक्यांच्या बंदीच्या आदेशामुळे ऐन दिवाळीत फटाके विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. गर्दी अपेक्षित असताना ग्राहक फिरकेनासे झाले आहेत.दिवाळीच्या सात दिवस अगोदर फटाक्यांची विक्री जोरदार सुरू झालेली असायची लहान मुलांसह हौशी मोठी माणसेदेखील गर्दी करत होती. मात्र हिवाळ्यात फटाक्यांच्या प्रदूषणामुळे अस्थमा, सर्दी, खोकला आदी आजार वाढून कोरोनाच्या संसर्गाला आमंत्रण असल्याचे काही आरोग्य संघटनांनी जाहीर केले. चक्कर, भुईनळे, नागगोळी, फुलबाज्या यामुळे दूषित वायू बाहेर पडून अधिक प्रदूषण होते. त्यामुळे यंदा मोठ्या शहरात फटाके फोडण्याला बंदी घालण्यात आली आहे. तसेच विदेशी व अनधिकृत फटाके विक्री अथवा साठा करताना आढळल्यास कारवाईचे संकेत शासनाने दिल्याने यंदा अमळनेरात फटाके विक्रेत्यांनी फक्त २५ टक्के माल मागवला आहे. काही दुकानदारांनी आपली दुकानेच मांडलेली नाहीत.वसूबारस येऊनदेखील गिऱ्हाईक फिरकेनासे झाले आहे. दुकानदार देवाप्रमाणे ग्राहकांची वाट बघत आहेत. येत्या तीन-चार दिवसाच्या दिवाळी कालावधीत व्यवसाय होईल की नाही, याचं चिंतेत दुकानदार आहेत. यावर्षी चायना फटाके, देवी देवतांची चित्रे असलेली फटाके बंद करण्यात आली असल्याने मुलांचे आकर्षणदेखील संपले आहे तर १८ टक्के जीएसटी करामुळे किंमती वाढल्या तरी स्वस्तात फटाके विकण्याचा निर्णय फटाके विक्रेत्यांनी घेतला आहे.
दिवाळी आली तरी कालपर्यंत बोहणी झालेली नव्हती. आज वसूबारसला मोजके ग्राहक फिरकले. २५ टक्के मालसुद्धा विक्री होणार नाही.-अमोल येवले, फटाके विक्रेता, अमळनेर
कोरोनापासून बचाव करण्यासाठी मुले वृद्धांसह यांची श्वसन यंत्रणा चांगली ठेवणे आवश्यक असल्याने फटाके न फोडण्याचा निर्णय योग्य राहील. -जयेश पाटील, सामाजिक कार्यकर्ता, अमळनेर