फिलर कुठला प्रसारित होत आहे यावरून ड्युटीवर कोण उद्घोषक आहे याची जाणीव श्रोत्यांना असणारा तो काळ! आणि त्यावेळी माझा आवडता फिलर म्हणजे सिंह यांनी मेंडोलीनवर वाजवलेली धून आणि ‘कॉल आॅफ द व्हॅली.’ १९६७ साली रिलीज झालेली ही रेकॉर्ड (आता अल्बम). काश्मीरचं हुबेहूब चित्र असणारं कव्हर-इथून-तिथपर्यंत पसरलेला शुभ्र हिमालय, हिरवळीवर सुखनैव विचरणारा मेंढ्यांचा कळप, काश्मिरी ललना... थोडक्यात ‘इंडियन शेफर्ड लाईफ इन कश्मीर’ हे शीर्षक सार्थ करणारं कव्हर... तर ही माझी पहिली (अप्रत्य) भेट. पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार शर्मा आणि वृजभूषण काबरा यांच्याशी पहाडी रागातील धून प्रसारित करताना आपणही ‘शिकारा’मधून, चप्पूने पाणी कापत ‘यही है स्वर्ग’ची अनुभूती घेत आहोत हा भास ! शततंत्री वीणा काय की सुफियाना मौसिकीत वापरलं जाणारं वाद्य काय किशोरीताई, उस्ताद बडे गुलामअली खाँ किंवा पंडित जसराज यांच्या हातातील स्वरमंडल काय... सारं कसं मिळतं जुळतं !हरिजींची बासरी आणि वृजभूषण काबरा यांची गिटार हळूवार, त्याहीपेक्षा अलगद वाजणारं ते संतूर. जिथं जिथं निसर्ग आहे तिथं तिथं संतूरचे नाजूक स्वर (‘झनक झनक पायल’ या चित्रपटातील अनेक दृश्य संतूरच्या हळूवार स्पर्शानं भारलेली) आम्हाला तर संगीतकार जयदेव यांनी संतूरचे स्वर गायला शिकवले. (‘ये दिल और उनकी निगाहोंके साये’ या गीताची सुरुवात आठवा.) पंडित शर्माजी यांनी हे वाद्य जगासमोर आणलं. भजन सोपोरी, रूस्तम सोपोरी, वर्षा अग्रवाल, तरुण भट्टाचार्य आणि आपले गुरू आणि पिताश्री यांच्या समवेत जुगलबंदी पेश करणारा राहुल शर्मा या सर्वांनी संतूरवादनात चार चाँद लावले. शिवकुमार शर्मा यांच्याकडे नि:शुल्क धडे गिरवणाऱ्या शिष्यांनाही सलाम.पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा (जन्म १३ जानेवारी १९३८) यांना बाल्टिमोर आणि इतर देशांचं नागरिकत्व मिळालं असे म्हणतात. पण त्यांची पहचान म्हणजे भारताची शान ! उत्कृष्ट तबलावादक आणि गायक! पिताश्रींच्या इच्छेनुसार संतूर (शततार) या लोकवाद्यावर अधिक संशोधन केलं आणि वयाच्या तेराव्या वर्षी मुंबईला पहिली संगीत सभा पेश केली.पद्मभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचाही जन्म (योगायोगाने) १९३८ चा. जन्म अलाहाबादचा, परंतु कार्यारंभ आकाशवाणी कटकला, संगीतकार आणि कलाकार म्हणून ! पंडित राजाराम, पंडित भोलानाथ प्रसन्न आणि अन्नपूर्णादेवी यांच्या सर्व अटी मान्य करून या सर्वांना सार्थ अभिमान वाटावा असं शिष्यत्व सिद्ध केलं. भुवनेश्वर आणि मुंबईला गुरुकुल स्थापित केलं. पंडित शिवकुमार शर्मा समान अनेक अनेक पाश्चिमात्य संगीतकारांसमवेत कला सादर केली.शिव-हरि या म्युझिकल डीयुओने भारतीय सिनेसृष्टीत श्रीगणेशा केला तो १९८१ या वर्षी ‘सिलसिला’ (यश चोप्रा फिल्म) या चित्रपटापासून.सर्व परिचित सर्व गीतं एकसे बढकर एक (मै और मेरी तनहाई, देखा एक ख्वाब, सरसे सरके आणि रंग बरसे हे होळीगीत चाँदनी (यशराज फिल्मस् १९८९) हा सिनेमा श्रीदेवीच्या अभिनयाने जितका पसंत केला गेला तितकाच शिव-हरिच्या संगीतानं. यातील अनेक दृश्य बर्फाळ प्रदेशात चित्रित आणि साहजिकच बासरी व संतूरचा सुंदर मिलाफ सातत्याने जाणवतो.शीर्षक गीत ‘मेरी चाँदनी, मेरे हाथों में नौ-नौ चूडियाँ’ इ.गाणी विसरायला होणार नाही. कारण आहे ‘मेलोडी’ तसंच ‘लम्हे’ (१९९१) या चित्रपटातील राजस्थानी लोकसंगीताचा प्रभाव असलेली गीतं (‘चूडियाँ खनक गयी’, किंवा ‘मीठे मीठे गीत मितवा’, ‘मेघा रे मेघा’ इ.) खूप पसंत केली गेली. ‘डर’ हा चित्रपट शाहरुख खानच्या क...क...किरणची आठवण करून देतो, तद्वत ‘जादू तेरी नज़र’ किंवा ‘तू मेरे सामने’ याही गीतांना युवा पिढीनं पसंत केलेला हा सिनेमा आम्हाला ‘शिव-हरि’ची यशस्वी कारकीर्द प्रस्तुत करतो.या जोडीनं ‘विजय’, ‘साहिबाँ’ (१९९३), ‘फासले’(१९८५) अशा अनेक चित्रपटांतून आपली कला सादर केली.पंडित हुसन्लाल-भगतराम, शंकर-जयकिशन, कल्याणजी-आनंदजी आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीनं हिंदी सिनेसृष्टीला अत्यंत मधाळ-मधुर, सर्वांगसुंदर अशी आणि स्मरणीय गीतं दिली. तीच सुवर्ण परंपरा ‘शिव-हरि’ यांनी कायम ठेवली. बाबूजी (संगीतकार-गायक) सुधीर फडके यांनी आपल्या मुलाला श्रीधर फडके यांना एकच-मोलाचा मंत्र दिला की, गीताची चाल साधी-सुमधूर असावी, जेणेकरून आमजनताही ती गाऊ शकेल. ‘आवारा हूँ’ हे गीत याचं उत्तम उदाहरण.रशियन गातात, ब्रिटीशर्सही गातात... आहे की नाही जादू? तशीच एक अंगाईगीत रचना ‘नीला आसमाँ सो गया’ ही अलबेला या चित्रपटातील ‘लोरी’ची आठवण करून देते. हे शिव-हरि यांचं यश! लोकसंगीताचा जिथं प्रभाव तिथं ‘लोक’ चुंबकीय प्रभावानं आकर्षित होतात आणि अशीच गाणी शिव-हरि यांनी दिलीत. म्हणूनच ‘रंग बरसे’ हे होळीगीत रंगपंचमीला हमखास दिसतं, वाजतं आणि गायलं जातं.- डॉ.उषा शर्मा, जळगाव
‘संतूर आणि बासरी, अर्थात शिव-हरि’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:24 AM