लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सारा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मृत नुर मोहम्मद पटेल याच्या नातेवाईकांनी केला आहे. नुर मोहम्मद पटेल यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाच्या उपचारांसाठी मेहरुण परिसरात असलेल्या सारा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार होत नसल्याची चिठ्ठी त्यांनी आपल्या नातेवाईकांना पाठवली. त्यानंतर गुरूवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे नातेवाईक शोएब पटेल यांनी हा आरोप केला आहे.
सारा हॉस्पिटलमध्ये नुर मोहम्मद पटेल यांना १५ दिवस आधी कोविडच्या उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावतच गेली. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच गुरूवारी त्यांचा मृत्यू झाला. उपचार सुरू असतानांच नुर पटेल यांनी आपली योग्य ती काळजी घेतली जात नसल्याची चिठ्ठी दोन वेळा बाहेर पाठवली होती. बुधवारी देखील त्यांनी अशीच चिठ्ठी आपल्या नातेवाईकांकडे दिली. त्यात त्यांनी रुग्णालयात रात्री असलेला कर्मचारी वर्ग आपल्याकडे लक्ष देत नाही. तसेच कृत्रिम ऑक्सिजनबाबत च्या समस्येवर देखील त्यांनी लिहले होते, अशी माहिती त्यांचे नातेवाईक शोएब पटेल यांनी दिली.
नुर मोहम्मद पटेल हे पाळधी ता धरणगाव येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
कोट -
रुग्णाचे नातेवाईक पहिल्या दिवसापासूनच आम्हाला त्रास देत होते. त्यांनी केलेली तक्रार ही पुर्वनियोजितच आहे. याची कल्पना आल्याने आम्ही लेखापरिक्षक कैलास सोनार यांनाही त्याची माहिती दिली होती. रुग्ण गंभीर असतानाही त्यांचे नातेवाईक वारंवार मध्ये येत होते. आम्हालाही तक्रार करण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. आमच्या लेटरपॅडवरच सर्व काही लिहिले गेले आहे. - डॉ. मिनाज पटेल, सारा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल.