लोकमत न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर : पंढरपुरात दरवर्षी आषाढी वारीत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांकडून भगिनी आदिशक्ती मुक्ताबाईस साडीचोळी भेट देण्याचा ऐतिहासिक भावनिक सोहळा शुक्रवारी मुक्ताबाई मठात पार पडला. यावेळी भाविक भावविभोर झाले होते.
शेकडो वर्षांची परंपरा जपत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीतर्फे विश्वस्त योगेश देसाई यांनी मुक्ताबाई पादुकांना मंत्रोच्चारात पंचामृत अभिषेक पूजा करून साडीचोळी अर्पण करून आरती केली. पौराहित्य निखिल प्रसादे यांनी केले. आळंदी संस्थानचे व्यवस्थापक रविराज बिंडे, श्री संत मुक्ताबाई संस्थान कोथळी- मुक्ताईनगर अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, विश्वस्त शंकरराव पाटील, नीळकंठराव पाटील, पंजाबराव पाटील, पालखी सोहळाप्रमुख रवींद्र महाराज हरणे, उध्दव जुनारे महाराज, नरेंद्र नारखेडे, सम्राट पाटील, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, रतिराम शास्त्री, संदीप महाराज मोतेकर, बबलू पाटील कासारखेड, अजाबराव पाटील, ज्ञानेश्वर हरणे, शशी पाटील व भाविक उपस्थित होते.
भाऊ-बहिण भेटीचा सोहळा अनुभवतांना भाविक भावनिक झाले होते. शुक्रवारी सकाळी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर व दुपारी सद्गुरू सखाराम महाराज ईलोरा दिडी परंपरेचे गादीपती व वंशज विश्वंभर महाराज तिजारे यांचे कीर्तन झाले. परतीच्या प्रवासात शिवशाही बस सजवण्याची सेवा नरेंद्र नारखेडे फैजपूर व भागवत पाटील कासारखेडा यांनी दिली.
गोपाळ काला व पांडुरंगाचे दर्शन करून आज माघारी परतणार
श्री संत मुक्ताबाई पालखी पादुका सोहळा शनिवारी सकाळी सहा वाजता गोपाळपूर येथे गोपाळकालानिमित्त ह.भ.प.रवींद्र महाराज हरणे यांचे काल्याचे कीर्तन होईल. तसेच भगवान श्रीविठ्ठल दर्शन व निरोप घेऊन दुपारी माघारी मुक्ताईनगर परतणार आहेत. रविवारी पहाटे चार वाजेपर्यंत पालखी सोहळा नेऊन मंदिरात मुक्ताईनगर येथे पोहचेल.