लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे पितृछत्र हरवलेल्या तरुणीच्या लग्नासाठी सोन्याचे मंगळसूत्र, दागिने, साड्या, आवश्यक वस्तू, भांडे आणि रोख मदत करीत भरारी फाउंडेशन व के.के.कॅन्सने दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते या तरुणीला ही मदत देण्यात आली. कोरोनामुळे अनाथ झालेल्या १० तरुणींच्या लग्नाची आणि २५ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी या दात्यांनी स्वीकारली आहे.
शिरसोली येथील दशरथ बुधा भिल (४८) यांचे कोरोनामुळे एप्रिल महिन्यात निधन झाले. कोरोनाच्या या संकटाने भिल कुटुंबावर मोठा आघात झाला. त्यात भिल यांची कन्या शुभांगी दशरथ भिल या तरुणीचा विवाह निश्चित झालेला होता. त्यात पितृछत्र हरवल्याने कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले. १६ जून रोजी पाचोरा येथे होणाऱ्या या विवाहासाठी दात्यांनी पुढाकार घेतला. विवाहासाठी लागणारे सोन्याचे मंगळसूत्र, दागिने, साड्या, संसाराला आवश्यक वस्तू, भांडे आणि रोख मदत अशी एकूण ३० हजारांपर्यंतची मदत जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते देण्यात आली.
पद्मावती मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला रजनीकांत कोठारी, दीपक परदेशी, डॉ. स्वप्नील चौधरी, अमित भाटिया, विनोद ढगे, अमर कुकरेजा, रवींद्र लढ्ढा, बाळासाहेब सूर्यवंशी, रितेश लिमडा, नीलेश जैन, दीपक विधाते, सचिन महाजन, नीलेश झोपे, विक्रांत चौधरी आदी उपस्थित होते. कोठारी यांनी तरुणीला सोन्याचे मंगळसूत्र, संपूर्ण भांड्यांचा सेट इतर संसारोपयोगी साहित्य, दागदागिने, साड्या आणि रोख रक्कम भेट दिली. कोरोनाकाळात अनेकांचे छत्र हरवले असून, काहींनी आपले मातृछत्र व पितृछत्रही गमावले आहे. समाजात पोरके झालेल्या हा घटकापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. हे दाते आपली सामाजिक बांधिलकी चोखपणे आणि निस्वार्थ भावनेने पार पाडत असून, भविष्यात देखील ते याच मार्गाने कार्यरत राहतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राऊत यांनी व्यक्त केला.