सातगाव डोंगरी, ता. पाचोरा : येथून विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. मात्र त्यांना यासाठी एसटी बसवर अवलंबून राहावे लागते. बसच्या सततच्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांनी गावाचता आलेली बस मंगळवारी अडविली. तसेच आगार प्रमुखांनी याबाबत काळजी घेऊन आमचे शैक्षणिक नुकसान होण्यापासून वाचवावे, अशी मागणीही केली आहे.सातगाव येथून दररोज पाचोरा येथे शिक्षणासाठी ५० ते ६० विद्यार्थी बसने ये-जा करत असतात. मात्र आगाराच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना विनाकारण त्रास होत आहे. सातगाव डोंगरी, तांडा तसेच पिंप्री येथून अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनी शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी दररोज बसने ये-जा करीत असतात. मात्र अनेकवेळा या विद्यार्थ्यांना एसटीच्या अनियमितपणामुळे त्रास भोगावा लागतो. या प्रकारामुळे पालक व ग्रामस्थांनी पाचोरा आगराविषयी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पुन्हा मंगळवारीही सकाळी आठ वाजता येणारी बस आलीच नाही. त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींचा राग अनावर झाला.सातगाव येथे दहा वाजता येणारी बस विद्यार्थ्यांनी अडवली. यापुढे बसच्या अनियमिततेमुळे आमचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी आगार प्रमुखांनी घ्यावी, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.बसच्या अनियमिततेमुळे होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.
३० सप्टेंबर रोजी पाचोरा येथून सातगावसाठी निघणारी सकाळी ७.२० ची तसेच ८.३० ची बस सातगाव येथे पोहोचलीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना भाडे खर्च करून खासगी वाहनाने पाचोरा येथे पोहोचावे लागले. तसेच पाच वाजता शाळा सुटल्यानंतर ५.३० ची बस सातगाव येथे लावण्यात आली नाही.ही सर्व मुले पिंपळगाव हरेश्वर गाडीमध्ये बसविण्यात आली. त्यांना शेवाळे येथे उतरवावे लागले. त्या दिवशी शेवाळे ते सातगाव हे आठ किलोमीटरचे अंतर विद्यार्थी पायी चालत गावी आले.
यापुढे काळजी घेऊ...बसेसच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. मात्र यापुढे विद्यार्थ्यांची अशी गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, पाचोरा आगार प्रमुख देवेंद्र वाणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.