जळगाव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांचा प्रसार व लाभार्थींना मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यासाठी जळगावमध्ये आयोजित करण्यात आला होता. महामंडळाच्या योजनांचा लाभार्थींनी लाभ घ्यावा आणि सामाजिक व शैक्षणिक उन्नती साधावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे होते. महाव्यवस्थापक अनिल म्हस्के, प्रादेशिक व्यवस्थापक आर. एम. राठोड, जिल्हा उद्योग केंद्राच्या मनीषा पाटील, जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या अधीक्षक साळुंके, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी सोमनाथ बिऱ्हाडे, डीआरडीएचे हरीश भोई यांची प्रमुख उपस्थिती होती.
विदेशातील उच्च शिक्षणासाठी असलेल्या कर्ज योजना, मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेत झालेली वाढ याची माहिती मेळाव्यात देण्यात आली. पाच लाखांची सुविधा कर्ज योजना, १ लाख ४० हजारांची महिला समृद्धी योजना आणि १ लाख ४० हजारांची लघु ऋण योजना ऑनलाइन सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र पुरस्कार प्राप्त व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, महामंडळामार्फत पूर्ण कर्जफेड केलेले व नियमित कर्जफेड करणारे लाभार्थी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कर्ज व अनुदान योजनेच्या धनादेशाचे आणि कर्जमंजुरी आदेशाचे वितरण लाभार्थींना करण्यात आले. प्रा. डॉ. अंगद अवघडे, सविता भोसले, रमेश कांबळे, सुरेश आंभोरे, विकास वलकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे (धुळे), नामदेव मोरे, रामचंद्र पाखरे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे यांनी केले. सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले.