आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठे हॉटस्पॉट ठरलेला चोपडा तालुका कोरोनातून सावरला आहे. तालुक्याने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. चोपड्यात सद्यस्थितीत केवळ ८ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, चोपड्यासह जिल्ह्यात पाच तालुक्यांमध्ये व जळगाव ग्रामीणमध्ये दहापेक्षा कमी रुग्ण आहेत. या तालुक्याची स्थिती कोरोनाच्या बाबतीत समाधानकारक आहे.
जिल्हाभरात दुसरी लाट ओसरत आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटचे सात रुग्ण आढळून आल्यानंतरही जिल्ह्यात संसर्ग किंवा मृत्यूचे प्रमाण वाढलेले नसल्याने मोठा दिलासा मिळाला होता. आता रुग्णसंख्या कधी एक तर कधी दोन अंकीच नोंदविली जात आहे. संसर्गाचे प्रमाण कमी झाले असून गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी ही एक टक्क्याच्या खालीच नोंदविली गेली आहे.
तर संसर्ग संपल्याचे होईल घोषित?
भडगाव, पाचोरा, बोदवड अशा काही तालुक्यांमध्ये गेल्या आठवडाभरापासून एकही रुग्ण आढळून आलेला नाही. सलग २८ दिवस कोणत्याही भागात एकही रुग्ण आढळून न आल्यास त्या भागात कोरोना संपल्याचे घोषित करण्यात येते; मात्र रुग्ण आढळून येत नसल्यामागच्या कारणांवर विचार होणे गरजेचे आहे. चाचण्यांचे प्रमाण व चाचण्या नियमित होत आहेत का? हे बघणे गरजेचे असल्याचे मत काही तज्ज्ञ व्यक्त करतात, कारण कोरोना अद्याप संपलेला नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
लक्षणे असलेले अधिक
एकूण सक्रिय २५७
लक्षणे असलेले २२७
लक्षणे नसलेले ३०
ऑक्सिजन पुरवठा करावा लागणारे रुग्ण ११४
अतिदक्षता विभागातील रुग्ण : ४३
सर्वात कमी रुग्ण असलेले पाच तालुके
भडगाव : ३
बोदवड : ४
मुक्ताईनगर : ६
जळगाव ग्रामीण : ६
एरंडोल : ७
चोपडा : ८
सर्वाधिक सक्रिय रुग्ण
चाळीसगाव : ७१
जळगाव शहर : ४३
भुसावळ २७
जामनेर १७
धरणगाव ११
अमळनेर ११
पाचोरा १०
पारोळा १०
रावेर १०