संत आत्मज्ञानी असतात म्हणून त्यांना ईश्वराचे यथार्थ रुप ज्ञान असते. निसर्ग आणि दृश्य जग यांच्याबद्दलच्या चुकीच्या कल्पना संत नाहीशा करतात. मोठे ध्येय साधण्यासाठी मोठे श्रम लागतात. ईश्वरप्राप्ती हे फार मोठे ध्येय आहे. अर्थात् त्याच्या दर्शनासाठी फार श्रम करणे अवश्य आहे. म्हणून पुष्कळ लोक तीर्थयात्रा करीत असतात. समर्थ रामदास स्वामींच्या मते देव कसा आहे, याचा शोध घेणारा पुरुष हजारोंमध्ये एखादाच निघतो. ईश्वराचे स्वरुप समजून घेताना एक ध्यानात ठेवावे की, ईश्वर हा काही एखादी व्यक्ती नव्हे. त्याला मानवशरीर व मानवधर्म नाही. अवताराला मानव शरीर असते पण त्याचे त्या शरीराशी तादात्त्म्य नसते. अवतार मानव देहात राहतो पण देहाला तो सीमीत होत नाही. सर्व देहांमध्ये समर्पणाने राहणाऱ्या देहबुद्धी नसते. आत्मबुद्धी असते. ईश्वर सर्व कर्ता आहे. त्याच्या संकल्पाने निर्माण झालेले जग त्याच्या ईशाºयावर चालते. तोच विश्वाचा नियंता व संचालक आहे. तो विश्वाचा आधी होता, सध्या विश्वामध्ये विद्यमान आहे, आणि निरंतर राहणार आहे. जीवांच्या हृदयात तो आत्मरुपाने विलसतो. विश्वाच्या अंर्तयामी तोच ईश्वर म्हणून संचालन करतो आणि सद्रुप परब्रह्म परमात्मा म्हणून तोच विश्व पार करुन राहतो.खरा देव निश्चल आहे. तो सर्वगुण संपन्न, सर्वज्ञ व सर्वशक्तीमान आहे. त्या व्यतिरिक्त कोणासही ईश्वर मानणे हा अविद्याजन्य भ्रम समजावा.- दादा महाराज जोशी, जळगाव.