शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार जाऊन शिंदे सरकार आले. यानंतर नुकताच शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात काही जण मंत्री पद न मिळाल्याने नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर काही जण हवे ते अथवा कमी महत्वाचे खाते मिळाल्याने नाराज असल्याचे दिसत आहेत. यातच आता, जळगाव ग्रामीण मतदार संघातील आमदार गुलाबराव पाटील यांना, मिळालेल्या खात्यासंदर्भात आपण समाधानी आहात का? असा प्रश्न केला असता त्यांनी हसत-हसत आणि अगदी शायरान्या अंदाजात उत्तर दिले आहे. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात 15 ऑगस्ट निमित्त गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यानंतर पाटील यांनी मांध्यमांशी संवाद साधला. यावेळी, खाते वाटपात मिळालेल्या खात्याबद्दल आपण समाधानी आहात का? असा प्रश्न केला असता, पाटील म्हणाले, "मिळालेल्या खात्यासंदर्भात आपण शंभर टक्के समाधानी आहोत. एवढेच नाही, तर 'पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिस में मिलादे लगे उस जैसा,'" अशा शायरान्या अंदाजातही, त्यांनी आपण मिळालेल्या खात्यासंदर्भात समाधानी असल्याचे म्हटले आहे. गालाबराव पाटील यांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पद मिळालेले आहे.
ध्वजारोहण सुरू असतानाच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न -येथे मंत्री गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच वंदना सुनील पाटील ( रा. जामनेर) या महिलेने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. जामनेर येथील काही धान्य व्यापाऱ्यांनी या महिलेच्या शेतमालाची परस्पर विक्री करत फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. यावर बोलताना त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करू, असेही गुलाबराव पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.