लोकमत न्यूज नेटवर्क
अजय पाटील
जळगाव - जिल्ह्याला लाभलेल्या अलौकीक नैसगिक सौदर्यांचा खजिना असलेला सातपूडा गेल्या आठ दिवसांपासून आगीच्या ज्वाळांनी धुमसतोय, गेल्या आठ दिवसात चोपडा तालुक्यातील विष्णापुर, वराड क्षेत्रासह अडावद वनक्षेत्रातील चिंचपाणी, वर्डी, वरगव्हाण भागातील सुमारे ८०० हेक्टर क्षेत्राचे जंगल जळून खाक झाले आहे. यामध्ये शेकडो सरपटणाऱ्या जिवांसह अनेक पक्ष्यांचे घरटे देखील या आगीच्या भक्ष्यस्थानी गेले आहे. मोठ्या क्षेत्रावर लागलेली आग आटोक्यात आणण्यास वन विभागाला अपुर्ण मनुष्यबळामुळे अपयश येत आहे. दिवसागणिक ही आग वाढत असून, आता आग विझविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील यंत्रणा तयार करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.
जळगाव जिल्ह्याला सुमारे ११० ते १२० किमीचा सातपूडा पर्वताची वनसंपदा लाभलेली आहे. वाघ, बिबट्या, अस्वलासह असंख्य व दुर्मीळ वनस्पतींचा हा सातपुडा एक खजिना आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये अतिक्रमण, शिकारी, वृक्षतोड व अशाप्रकारे लागणाऱ्या आगींमुळे हा ही वनसंपदा नष्ट होण्याचा मार्गावर आहे. वन विभागाकडून प्रयत्न केले जात असले तरी कमी मनुष्यबळामुळे ही वनसंपदा वाचविण्यासाठीचे प्रयत्न कमी पडत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सातपुड्यातील वैजापुर व अडावद या दोन्ही वनविभागात आगी लागल्या आहेत. वनविभागाकडील कमी मनुष्यबळामुळे ही आग आटोक्यात आणण्यास अपयश येत आहे.
आग लागण्याचे ही असू शकतात कारणे
१. जिल्ह्यात वनक्षेत्रात एप्रिल व मे महिन्यात वणवे पेटत असतात. अनेकदा हे वणवे उन्हामुळे पेटतात. मात्र, फेब्रुवारी व मार्च महिन्यातच हे वणवे लागणे शक्य नसल्याने हे वणवे मानवनिर्मीत असण्याची शक्यता वनविभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
२. सातपुड्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणधारकांकडून ही आग लावली गेल्याची शक्यता आहे.
३. या काळात सातपुड्यात अनेकांकडून डींक काढण्याचे काम केले जाते. या कामादरम्यान वन्यजीवजवळ येवू नये म्हणून देखील ही आग लावली गेल्याची शक्यता आहे.
४. वरगव्हाण, बिडगाव, चिंचपाणी भागात काही दिवसांपुर्वी अस्वल आल्याची अफवा पसरली होती. या अस्वलाच्या भितीने सातपूड्यात गुर-ढोरं चरण्यासाठी घेवून गेलेल्यांनी आग लावली असल्याचीही शक्यता आहे.
५. सातपुड्यात गेल्या काही वर्षांपासून मानवी हस्तक्षेप वाढत आहे. या जंगलामध्ये जावून पार्ट्या करणे, सिगारेट ओढणे असे प्रकार चालतात. त्यातून ही आग लावली गेल्याचाही संशय आहे.
सुमारे ५० किमीवरून दिसतोय वणवा
अडावद वनक्षेत्रातील सातपुड्याची उंची सुमारे ४०० ते ८०० मीटर पर्यंत आहेत. त्यामुळे या भागात लागलेले वणवे इतके मोठे आहेत की रात्रीच्या वेळेस सुमारे ५० किमी दुर वरून देखील दिसत आहेत. या आगीमुळे परिसरातील गावांमधून सातपूड्यात दिवसा धुरीचे लोट तर रात्रीच्या वेळेस आगीच्या ज्वाळा दिसून येत आहे.
७० कर्मचाऱ्यांवर हजारो क्षेत्राचा व्याप
आग विझविण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून जिकरीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, केवळ ७० कर्मचाऱ्यांवर सुमारे ५ ते ७ हजार हेक्टर जंगलाचा व्याप आहे. वैजापुर वनक्षेत्रात एकूण ३० तर अडावद वनक्षेत्रात ४० असे एकूण ७० कर्मचारी आहेत. सातपुड्याचा उंच शिखरांवर ही आग लागली असून, तीथपर्यंत जाण्यासाठीही वन कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. अग्निशमन विभागाच्या गाड्या त्याठिकाणी पोहचणे शक्यच नाही. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांना झाडाच्या फांद्यापासून ही आग विझवावी लागत आहे.
शेकडो वन्यजीवांचा मृत्यू
आठ दिवसांपासून लागलेल्या आगीत शेकडो सरपटणाऱ्या प्राण्यांसह अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. तसेच शेकडो दुर्मीळ वनस्पती व मोठी वनसंपदा देखील या आगीत जळून खाक झाली आहे.
कोट..
विष्णापुर भागात ही आग लागली असून, ही आग विझविण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. आग ही मानवनिर्मीत असून, त्याचा शोध देखील वनविभागाकडून घेतला जात आहे.
-समाधान सोनवणे, प्रादेशिक वन अधिकारी , वैजापुर
वरगव्हाण व उनपदेवच्या वरील भागात ही आग लागली आहे. आगीत झालेल्या नुकसानीची आकडेवारी काढली जात आहे. अजूनही मोठ्या भागात आग कायम असून, ती विझविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
-विक्रम पदमोर, प्रादेशिक वन अधिकारी, अडावद