रावेर : कामापुरते काम म्हणून नोकरी करून सेवानिवृत्तीनंतर आरामदायी जीवन जगण्याचे वेध लागलेले असतात. मात्र, तालुक्यातील वाघोड येथील महाराष्ट्र विद्या मंदिर या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक बी. एस. मराठे यांनी ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होताना समाजातील भूमीहीन विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी चक्क १ लाख ५१ हजार रुपयाची चक्रवर्ती ठेव शिक्षण संस्थेच्या नावावर ठेवून समाजऋणातून उतराई होण्याचा आदर्श प्रस्थापित केला आहे.
वाघोड येथील भारत एज्युकेशन सोसायटी संचलित महाराष्ट्र विद्या मंदिर या माध्यमिक शाळेत बाळू सबा मराठे (रा. बोरसोर, ता. बऱ्हाणपूर ह. मु रावेर) यांनी उपशिक्षिक व मुख्याध्यापक पदावर ३१ वर्षे अविरत शिस्तप्रिय व उत्कृष्ट सेवा बजावली.
दरम्यान, दिल्ली येथील राजधानीत सुरू असलेल्या किसान आंदोलनात सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲड. बोबडे यांना पत्रकारांशी बोलताना केंद्र सरकारने लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या वक्तव्यातून आपणही सेवानिवृत्त झाल्यानंतर भूमीहीन विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे, असा मनस्वी संकल्प केला. त्यांनी ३१ ऑगस्ट रोजी मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होताना हा संकल्प अमलात आणला.
बी. एस. मराठे यांनी त्यांच्या अर्धांगिनी रजनी बाळू मराठे यांच्या नावाने मरणोपरांत भूमीहीन विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी १ लाख ५१ हजार रुपयांची चक्रवर्ती ठेव योजना भारत एज्युकेशन सोसायटी या संस्थेमार्फत महाराष्ट्र विद्या मंदिर या माध्यमिक शाळेतील भूमीहीन विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धनादेश प्रदान करून राबवली आहे.
या ठेव योजनेतील मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी निधी खर्च करण्याची संकल्पना आहे. त्यांचे सासरे तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी. एस. पाटील यांचे माध्यमातून माध्यमिक शिक्षक म्हणून या शाळेत त्यांना संधी प्राप्त झाल्याने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या सुकन्येच्या नावाने ही विद्यार्थी हिताची योजना राबविण्यात उदात्त हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
किंबहुना, त्यांच्या सुकन्येचीही नुकतीच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाल्याने व मुलगाही सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला असल्याने दोन्ही मुलांनी प्रत्येकी एक-एक लाख रुपयेप्रमाणे दोन लाख रुपयांची गुंतवणूक या ठेव योजनेत करण्याचा संकल्प केला असल्याचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी.एस. मराठे यांनी स्पष्ट केले.
मोतीराम पाटील
वाघोड, ता. रावेर : येथील सामाजिक कार्यकर्ते मोतीराम लक्ष्मण पाटील (६५) यांचे ८ ऑगस्ट रोजी निधन झाले. युवा सामाजिक कार्यकर्ते वामन पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.