आत्माराम गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क
खडकदेवळा, ता. पाचोरा : पाचोऱ्यात रेल्वेपोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवत धावत्या रेल्वेतून पडलेल्या महिलेचे प्राण वाचवून महिलेला तिच्या पतीकडे सोपवले आहे.
दि. ४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजण्यापूर्वी पाचोरा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नं. २ जवळून ०२७८० गोवा एक्सप्रेस ही गाडी जात असतानाच एका महिलेचा तोल जावुन ती अचानक प्लॅटफॉर्म नं. २वर कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने महिलाही बेशुद्ध अवस्थेत होती. यावेळी स्थानकावर सेवा बजावत असलेले जी. आर. पी. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ईश्र्वर बोरुडे व पोलिस नाईक दिनेश पाटील यांनी रुग्णवाहिका चालक बबलू मराठे व नदीम शेख यांच्या सहाय्याने तात्काळ गंभीर जखमी महिलेस येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, परिचारीका दुर्गा तेली हे प्रथोमोपचार करताना जी. आर. पी. यांना या महिलेजवळ आधारकार्ड आढळून आले. त्यावरुन ही महिला लक्ष्मीदेवी रामकुमार होतमसिंग (मेहगांव, जि. भिंड (मध्य प्रदेश) असल्याचे सिद्ध झाले. तसेच आधारकार्डच्या मागील बाजूस एक मोबाईल नंबर लिहिलेला आढळुन आला. त्या क्रमांकावर फोन केल्यावर तो क्रमांक तिच्या पती रामकुमार होतमसिंग याचा असल्याने रामकुमार यास घटनेची माहिती देवून त्यांना पाचोरा येथे येण्याचे सांगितले. लक्ष्मीदेवी हिला पती रामकुमार होतमसिंग यांचे स्वाधीन करण्यात आले आहे.