विभागीय आयुक्तांकडून २७ बंडखोर नगरसेवकांना नोटिसा : तीन महिन्यांनंतर प्राप्त झाल्या नोटिसा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा व्हीप झुगारून शिवसेनेला मतदान करणाऱ्या भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांना बुधवारी अपात्रतेबाबतच्या नोटीसा प्राप्त झाल्या आहेत. सात दिवसात या नगरसेवकांना आपली बाजू मांडण्याची मुदत दिली असून, सहा दिवसात आपली बाजू न मांडल्यास, एकतर्फी निर्णय घेऊन कारवाई करण्याचा इशारा विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे.
महापालिकेच्या मार्च महिन्यात झालेल्या महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपचा व्हीप झुगारून भाजपच्या २७ नगरसेवकांनी पक्षाविरोधात बंड पुकारले होते. तसेच या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान न करता शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते. याबाबत भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी नाशिक येथे विभागीय आयक्तांकडे २७ नगरसेवकांना अपात्र करण्याबाबत प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव दाखल केल्यानंतर तब्बल तीन महिने झाल्यानंतर या नोटिसा मनपा आयुक्तांकडे मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्या आहेत.
भाजपने तब्बल ३० हजार पानांचा दाखल केला आहे प्रस्ताव
बंडखोर नगरसेवकांना अपात्र करण्याबाबत भाजपने विभागीय आयुक्तांकडे मार्च महिन्यात तब्बल ३० हजार पानांचा प्रस्ताव दाखल केला आहे. यासाठी नाशिकचे काही नगरसेवक व काही विधिज्ञदेखील कामाला लावले होते. सध्या या नोटिसा मनपाकडे असून, लवकरच या नोटिसा नगरसेवकांना देण्यात येणार आहेत. दरम्यान, नगरसेवक या नोटिसा स्वीकारण्याच्या तयारीत नसून, मनपाकडून या नोटिसा नगरसेवकांच्या घराच्या पत्त्यावर जाऊन देण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नगरसेवकांनीही केली तयारी
अपात्रतेबाबतच्या नोटिसा मनपाला प्राप्त झाल्यानंतर २७ नगरसेवकदेखील कामाला लागले आहेत. नगरसेवकांनी बुधवारी काही विधिज्ञांसोबत चर्चा करून, पुढील प्रक्रियेबाबत माहिती जाणून घेतली आहे. तसेच नोटिसीचे उत्तर काय द्यावे याबाबतदेखील विधिज्ञांचा सल्ला घेऊनच नगरसेवक आपली भूमिका विभागीय आयुक्तांकडे मांडणार आहेत. दरम्यान, महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या २७ नगरसेवकांविरोधात भाजपने प्रस्ताव दाखल केला होता. त्या सर्व नगरसेवकांना नोटिसा प्राप्त झाल्या असून, निवडणुकीनंतर भाजपच्या तीन नगरसेवकांनी देखील भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. या ३ नगरसेवकांविरोधातदेखील भाजपकडून लवकरच अपात्रतेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.