जळगाव : ५० खोके, सर्व ओके असे वारंवार बोलले जात आहे. म्हणून आपण ओके तर ओके असे बोललो. मात्र याचा अर्थ आपण ५० खोके घेतले असा होत नाही. मी जे बोललो नाही व जे सांगितले त्याचा विपर्यास करून माझ्या विरोधात आंदोलन करणे म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे, अशी टीका पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेच्या आंदोलनावर सोमवारी केली.
गुलाबराव पाटील यांनी स्त्री रोग तज्ज्ञांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करीत शिवसेनेच्यावतीने सोमवारी महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. त्या विषयी गुलाबराव पाटील म्हणाले की, मी स्त्री रोग तज्ज्ञांविषयी काही बोललो नाही. मी जे बोललो त्याचा विपर्यास केला गेला. आम्ही जनरल फिजिशियन आहे, दररोज मोठी ओपीडी काढतो, असे या पूर्वी अनेकवेळा बोललो असून त्याचा वेगळा अर्थ काढला गेला, असे गुलाबराव पाटील म्हणाले. त्या अपूर्ण माहितीवर शिवसेनेने आंदोलन करणे हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले.
ओके तर ओके
५० खोके, सर्व ओके असे जे आरोप केले जात आहे, ते बिनबुडाचे असून त्याला काहीही अर्थ नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले. या बाबत वारंवार विचारणा होऊ लागल्याने ओके तर ओके, असे मी म्हणालो म्हणजे आम्ही ५० खोके घेतल्याचे मान्य केले असे होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत कसे निवडून आले?
राज्यसभा निवडणुकीवेळी शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत यांनाच आम्ही मतदान केले की नाही? मग आम्ही कसे विकले जाऊ शकतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जिल्हा नियोजन समितीची बैठक आता पालकमंत्री नियुक्ती नंतरच होऊ शकेल, असे गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच चोपडा तालुक्यात ऊसाचे मोठे नुकसान होत असून त्यासाठीही पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.