लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पुण्यातील घर भाडेतत्वावर हवे असल्याचे सांगत डिपॉझिटची रक्क्म पाठवित असल्याचा बहाणा करून विजय कॉलनीतील मुरलीधर रामचंद्र झोपे यांना ७३ हजार ५०० रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गंडा घालणा-या रणदिप सिंग व राहुल कुमार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय कॉलनीत मुरलीधर झोपे कुटूंबासह वास्तव्यास आहे. त्याचे पुणे येथे घर आहे. सद्यस्थितीला तेथे कुणीही वास्तव्यास नाही. त्यामुळे त्यांनी ते भाडेतत्वावर देण्याबाबत जाहिरात दिली होती. १९ मे रोजी दुपारी त्यांना रणदिप सिंग नावाच्या व्यक्तीने संपर्क केला. मुळ जम्मु काश्मिर येथील रहिवासी असून सध्या ग्वाल्हेर येथे भारतीय सैन्य दलात नाईक या पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. पुणे येथे बदली झाली असल्यामुळे आपल्याला घर भाडेतत्वावर घ्यायचे आहे, असेही त्याने सांगितले. नंतर झोपे यांनी त्यास घराचे फोटो व भाडे रक्कम व डिपॉझिटची रक्कम माहिती पाठविली.
एक रूपया पाठवून केली खात्री...
घराच्या डिपॉझिटची रक्कम पाठवायची आहे, असे सांगत रणदिप सिंग याने झोपे यांचा मोबाईल क्रमांक मिळविला. नंतर फोनवर राहुल कुमार यांच्याशी ओळख करून दिली. मोबाईल क्रमांक खात्याची लिंक आहे की नाही तपासण्यासाठी आधी राहुल कुमार याने झोपे यांच्या मोबाईल क्रमांकावर एक रूपया पाठविला. खात्री होताच, त्यांनी झोपे यांना क्युआर कोड पाठविले व ते स्कॅन केल्यास खात्यावर डिपॉझिटची २४ हजार ५०० रूपये जमा होतील, असे सिंग याने सांगितले. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर काही वेळाने झोपे यांनी त्यांचे बँक खाते तपासले असता, त्यांच्या खात्यातून ७३ हजार ५०० रूपयांची रक्कम राहुल कुमार यांच्या खात्यावर वर्ग झालेली दिसून आली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच, त्यांनी शनिवारी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.