ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 29 - रक्तदान चळवळीला मोठे यश येत असून दिवसेंदिवस रक्तदानाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे जळगावात रक्ताचा तुटवडा भासणे नगण्य आहे. हा तुटवडा शून्यावर आणण्यासाठी एक सोबत 500 ते 1000 बाटल्या रक्तसंकलन करण्यापेक्षा ते प्रमाण 50 ते 100 बाटल्यांवर आणणे गरजेचे आहे. यासाठी टप्प्या-टप्प्याने रक्तदान शिबिर घेऊन त्यात सलगता ठेवणे महत्त्वाचे आहे, असा सूर रक्तपेढी पदाधिकारी व रक्तदात्यांच्या चर्चेतून उमटला. 1 ऑक्टोबर रोजी ऐच्छिक रक्तदान दिन व संपूर्ण महिना ऐच्छिक रक्तदान महिना म्हणून साजरा होणार असल्याने या पाश्र्वभूमीवर जिल्हा क्रीडा संकुलातील ‘लोकमत’ कार्यालयात शहरातील रक्तपेढी पदाधिकारी, रक्तदाते यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सचिव अनिल कांकरिया, जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. उमेश कोल्हे, डॉ. अजरुन सुतार, माधवराव गोळवलकर रक्तपेढीचे सह प्रकल्प प्रमुख डॉ. रवी हिराणी, दीपक जोशी, तुफान शर्मा, वैद्यकीय संचालक तथा कर्करोगतज्ज्ञ डॉ. नितीन चौधरी, व्यवस्थापक भानुदास येवलेकर, जनसंपर्क अधिकारी पवन येपुरे, रक्तदाते संत निरंकारी मंडळाचे सुरेश तलरेजा, शैलेश वाणी, शीखा वाणी उपस्थित होते. रक्तदान शिबिर आयोजित केल्यानंतर त्यामध्ये जास्तीत जास्त रक्त बाटल्यांचे संकलन करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तसे न करता केवळ 50 ते 100 बाटल्यांचे रक्त संकलन करून यात सातत्य ठेवल्यास मोठी मदत होणे शक्य आहे. कारण एक सोबत जेवढे रक्त जमा झाले त्याची मुदतही एकाच वेळी संपते. त्यामुळे ऐनवेळी एखादा रक्तदाता न भेटल्यास अडचणी येऊ शकतात. यासाठी रक्तदानात सलगता ठेवणे महत्त्वाचे असल्याचा सूर यावेळी उमटला. या सोबतच वाढदिवस, घरातील काही आनंदाचे क्षण, पुण्यतिथी अथवा इतर प्रसंगानुसार रक्तपेढय़ांमध्ये जाऊन रक्तदान केल्यास कायमस्वरुपी व मुदतीतील रक्तसाठा उपलब्ध राहू शकतो, असाही विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. रक्तदानामध्ये देशात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. मात्र दुसरी धोकादायक बाब म्हणजे रक्तसंकलन करताना योग्य दक्षता न घेतल्याने एचआयव्हीचाही प्रसार महाराष्ट्रातच जास्त वाढला असल्याचीही दुसरी बाजू आहे. मात्र जळगावातील रक्तपेढय़ांच्या दक्षता व सतर्कतेमुळे जळगाव जिल्ह्यात रक्तदानातून एचआयव्हीचे प्रमाण शून्य असल्याचे या वेळी आवजरून सांगण्यात आले. या वेळी रक्तपेढय़ांमार्फत राबविण्यात येणा:या विविध उपक्रमांची माहिती देण्यात येऊन रक्तदाते सुरेश तलरेजा, शैलेश वाणी, शीखा वाणी यांनीही रक्तदानाचे फायदे यावेळी सांगितले. उन्हाळा असो की कोणताही ऋतू, त्यामध्ये सर्व जण रक्तदान करू शकतात. उन्हाळ्य़ात रक्तदान होत नाही व नेमके त्याचवेळी रक्त कमी पडते. उन्हाळ्य़ातही रक्तदान केल्यास शरीरावर कोणताही परिणाम होत नाही, असाही सल्ला देण्यात आला.रक्ताअभावी पाच वर्षात एकाचाही मृत्यू नाहीजळगावात रक्तदान चळवळीमुळे मोठा फायदा होत असून सर्वच रक्तपेढय़ांमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असल्याने गेल्या पाच वर्षात जळगाव जिल्ह्यात रक्ताअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. रक्तदानाबाबत अद्यापही गैरसमज आहे. अनेक महिला रक्तदान करण्यास तयार होत नाही. तरुणवर्गही याकडे फारसा लक्ष देत नाही. त्यामुळे महिलांचे व 18 ते 28 वयोगटातील तरुण वर्गाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे.