आॅनलाईन लोकमत, जळगाव, दि.११- अनुसूचित जातीमध्ये भटक्या विमुक्तांप्रमाणे आरक्षणात लोकसंख्येच्या आधारे अ, ब, क व ड प्रवर्ग लागू करावा, जेणे करून आरक्षणातही वंचित राहिलेल्या मातंग समाजाला योग्य न्याय व संधी मिळेल, अशी मागणी माजी मंत्री तसेच बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांनी शुक्रवारी सकाळी पद्मालय विश्रामगृहावर आयोजित पत्रपरिषदेत बोलताना केली.अण्णाभाऊ साठेजयंतीनिमित्त बहुजन रतय परिषदेतर्फे राज्यभरात काढण्यात काढलेल्या वाटेगाव ते चिरागनगर समाज प्रबोधन संवाद यात्रेचे जळगावात आगमन झाले. त्यानिमित्त या पत्रपरिषदेचे आयोजन केले होते. ढोबळे म्हणाले की, मंदाकृष्ण मादिगांनी देशभरात सुरू केलेली सामाजिक चळवळ विचारात घेऊन अनुसूचित जातीमध्ये देखील भटक्या विमुक्तांप्रमाणे अ, ब, क, ड प्रवर्ग लागू करावा अशी अवघ्या उपेक्षित पोटजातीची अपेक्षा आहे. राज्यभरात एकट्या मातंग समाजात ३०० संघटना असून दलित समाजातील प्रमुख ५ पोटजातीमध्ये अशीच मतभेदाची दारूण अवस्था आहे. अनुसूचीत जातीच्या ५९ जातीमधील ५२ उपेक्षित जाती अशा आहेत की त्यांना सवलती कशाशी खातात हे देखील माहित नाही. अशा उपेक्षित जातींना सवलतींचा प्रत्यक्ष लाभ मिळायचा असेल तर अ,ब, क, ड असा प्रवर्ग लागू करणे आवश्यक आहे. राज्यात दलित समाजाची लोकसंख्या १ कोटी ३० लाख आहे. त्यात बौद्ध समाजाची लोकसंख्या ६५ लाख आहे. त्यांना ‘अ’ वर्ग द्यावा. मातंग समाजाची लोकसंख्या २८ लाख आहे. त्यांना ‘ब’ वर्ग द्यावा. तर मोची, कोलार, चर्मकार व ढोर या चार जातींना ‘क’ वर्ग तर ११ ते १२ लाख लोकसंख्या असलेल्या उर्वरीत ५२ जातींना ‘ड’ वर्ग द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. ते म्हणाले की, मातंग समाजात तसेच अन्य मागास समाजात शिक्षण, आरोग्य, अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती या चार मुद्यांवर संवाद साधून प्रबोधन करण्यासाठी ही संवाद यात्रा काढली आहे. दररोज वाड्या, वस्त्यांवर किमान ६ सभा घेतो, कार्यकर्त्यांशी चर्चा करतो, असे सांगितले. मुलांना मिरवणुकीने शाळेत घाला ढोबळे म्हणाले की, शिक्षणाचे महत्व समजून घेतले पाहिजे. आपली मुल मिरवणुकीने पहिलीच्या शाळेत घालणे हा अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त केलेला संकल्प आहे. आरोग्य, शिक्षण, बचतगट यात पुढाकार घेण्यासाठी प्रयत्न करणे हा जयंतीनिमित्त आखलेला कार्यक्रम आहे. गावात बौद्धांची चार घर असली तरी गाव दचकून राहत. मातंग समाजाला मात्र गृहित धरल जात. नोकरी, धंदा, आरक्षणाला सवलत हवी असेल तर बौद्धांच किंवा बौद्ध धर्माच्या लोकांच अनुकरण करा, असा समाजबांधवांना सल्ला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष मोहन चव्हाण, संवाद यात्रेचे उत्तर महाराष्टÑ समन्वयक रविंद्र वाकळे, जळगावचे ज्ञानेश्वर सुरवाडे, राजस कोतवाल आदी उपस्थित होते.
अनुसूचित जाती आरक्षणातही प्रवर्ग लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 1:33 PM
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची मागणी: समाज प्रबोधन संवाद यात्रा दाखल
ठळक मुद्देबहुजन रयत परिषदेतर्फे राज्यभरात जाणार यात्रामुलांना मिरवणुकीने शाळेत घालाआरक्षणात लोकसंख्येच्या आधारे अ, ब, क व ड प्रवर्ग लागू करावा