जळगाव : कोणत्याही दिवशी गेले तरी मोठे साहेब भेटतील, असे मनात ठेवून जिल्हा परिषदेत येणार असाल, तर तसे करू नका. कारण, आता भेटींचे वेळापत्रक फिक्स करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येकाला दिवस ठरवून देण्यात आले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर याची माहिती जनतेसाठी लावण्यात आली आहे.
जिल्हाभरातून वेगवेगळ्या समस्या घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटायला आलेल्या ग्रामस्थांची जि.प.मध्ये दररोज गर्दी असते. काहींचे प्रश्न नवीन असतात, तर काही विषयांत पाठपुरावा हवा असतो. परंतु, प्रशासकीय बैठका, दौरे असल्यास अधिकाऱ्यांची भेट होत नाही. त्यामुळे अनेकांची जळगावची फेरी आणि ये-जा करण्याचा खर्च वाया जायचा. हे प्रकार टाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी भेटीचे दिवस व वेळ निश्चित केली आहे. राज्य शासनाने देखील गेल्या महिन्यात सूचना केली होती. त्यानुसार वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
भेटीसाठी हे दिवस लक्षात ठेवा
१) सर्वसामान्य जनतेसाठी प्रत्येक आठवड्यातील सोमवार व शुक्रवार, दुपारी १२ ते १:३० हा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.
२) जि. प. कर्मचारी, शिक्षक संवर्ग, सेवानिवृत्त कर्मचारी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या मंगळवारी, दुपारी १२ ते १:३० वेळेत भेटू शकतील. पण यामध्ये बदली हा विषय वर्ज्य करण्यात आला आहे.
३) ग्राम पंचायत विभागाशी संबंधित सर्व तक्रारी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी, दुपारी ३ ते ६ वेळेत ऐकल्या जाणार आहेत. यावेळी तालुक्याचे विस्तार अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या समक्ष तक्रारींचा निपटारा केला जाईल. यामुळे तक्रारकर्त्यांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. याच दिवशी विस्तार अधिकाऱ्यांची बैठक देखील मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांना नो एन्ट्री...
दौरे आणि सभेचे दिवस वगळून अभ्यागतांना भेटीसाठी सोमवारी व शुक्रवार, दुपारी १२ वाजताची वेळ देण्यात आली आहे. या वेळेत शासकीय कर्मचारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटू शकणार नाहीत.