लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महाडीबीटी प्रणालीवरील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी १५ एप्रिल ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांनी वर्ष २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेशित व नूतनीकरणाचे अर्ज विद्यार्थ्यांकडून परिपूर्ण भरून घेऊन पोर्टलला सादर करावे व विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती तसेच मार्गदर्शन करावे, अशा सूचना समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी ८ एप्रिलला काढलेल्या पत्राद्वारे महाविद्यालयांना केली आहे.
सामाजिक न्याय विभागाद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी विभागाद्वारे महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. ३ डिसेंबरपासून विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी प्रणाली सुरू करण्यात आली आहे, तर विद्यार्थ्यांना आता १५ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर अर्ज करण्याची संधी मिळणार नाही. तसेच पडताळणीत ज्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून येतील, त्या तत्काळ दुरुस्त करून अर्ज पाठविण्याचेही आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.
अन्यथ कार्यवाही होणार
ज्या पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. मात्र, त्याबाबतचे देयक तयार झालेले नाही, अशा विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची रक्कम वसूल न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. तसे केल्याचे आढळल्यास फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असेही सहायक आयुक्तांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
अर्ज प्रलंबित ठेवू नका
विद्यार्थ्याने ऑनलाइन प्रणालीत अर्ज भरूनही महाविद्यालय स्तरावर सदर अर्ज प्रलंबित ठेवल्यास संबंधित प्राचार्य, शिष्यवृत्ती कामकाज पाहणारे कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून आवश्यक कार्यवाहीकरिता संबंधित विभागास शिफारस करण्यात येईल, असेही समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांच्या सूचना पत्रात म्हटले आहे.