लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मार्च महिना संपण्यासाठी नऊ दिवस शिल्लक असताना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील १७ हजार ६१ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज अद्याप महाविद्यालयांमध्ये अडकले आहेत. अर्ज प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज मंजुरीसाठी पाठविण्यात यावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्ग इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानुषंगाने शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २०२०-२१ या वर्षातील शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. परंतु मार्च एण्डिंग केवळ नऊ दिवसांचा कालावधी उरला असताना, जिल्ह्यातील ३३८ महाविद्यालयांकडून १७ हजार ६१ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज अद्याप समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही.
विद्यार्थ्यांचे असे आहेत प्रलंबित अर्ज!
शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३३८ महाविद्यालयांमध्ये १७ हजार ६१ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे दोन हजार ६२० अर्ज आणि इतर मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गातील १४ हजार ४४१ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित आहेत.
एकूण ४९ हजार ४८२ अर्ज
३३८ महाविद्यालयातील हजार ४८२ विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी २५ हजार ४०३ अर्जांना महाविद्यालयाकडून मान्यता देऊन सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या लॉगिनला पाठविण्यात आले आहे. या सर्व अर्जांना सहाय्यक आयुक्तांनी मंजुरी देऊन शासनाकडे पाठविले आहे. त्यानुसार १७ हजार ३९१ विद्यार्थ्यांच्या खात्यावर एकूण ११ कोटी ९१ लाख ६७ हजार ५९० रुपयांची शिष्यवृत्ती जमा झाली आहे. दरम्यान, ७४ अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले आहेत.
उशिरा योजनेला सुरुवात
कोरोनामुळे ही योजना तब्बल सहा महिने उशिरा झाली. ३ डिसेंबरला प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झाली. नंतर महाविद्यालयसुद्धा उशिराने सुरू झाली. कोरोनामुळे कर्मचाऱ्यांची पन्नास टक्के उपस्थिती, त्यामुळे ही पेंडन्सी असून, लवकरात लवकर संपूर्ण मंजूर केले जातील. त्यासाठी महाविद्यालयांनी तात्काळ अर्ज पाठवावे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालये- ३३८
अनुसूचित जाती प्रवर्ग- २,६२० (प्रलंबित)
इतर मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्ग- १४,४४१