लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रथम सत्राचा काळ उलटून गेला तरी कोरोनामुळे यंदा सुरू होऊ न शकलेल्या जिल्ह्यातील शाळा आता मंगळवार, ८ डिसेंबरपासून सुरू होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहे. आवश्यक पडताळणी करून शाळा सुरू करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, मनपा, न.पा. प्रशासन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू होणार आहे.
गेल्या वर्षाचे शैक्षणिक वर्ष संपलेही नसताना मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढला व शाळांच्या वार्षिक परीक्षादेखील होऊ शकल्या नव्हत्या. दिवसेंदिवस संसर्ग वाढत गेल्याने ऐन शाळा सुरू होण्याच्या जून महिन्याच्या कालावधीत तर हा संसर्ग उच्चांकीवर पोहचला. त्यामुळे यंदा शाळा-महाविद्यालय सुरू होऊ शकले नाही. त्यानंतर मात्र २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या वर्ग सुरू करण्यास शासनाची परवानगी दिली. मात्र यात स्थानिक परिस्थिती पाहूनच शाळा सुरू करण्याबाबतही सूचित करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनातर्फे ७ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला होता.
शाळा समिती व पालक शिक्षक संघाच्या सभा
२३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू होऊ न शकल्याने आता ८ डिसेंबर पासून शाळा सुरु करायच्या असल्याने त्यापार्श्वभूमीवर तयारी सुरू झाली आहे. यासाठी उपाययोजनांच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये शाळा स्तरावर शाळा समिती व पालक शिक्षक संघ यांच्या सभा घेऊन विविध मुद्यांवर पडताळणी करून शाळा सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पुन्हा चाचणी नाही, मात्र पॉझिटिव्हसाठी विलगीकरण
२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याने त्यापार्श्वभूमीवर शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र शाळाच सुरू न झाल्याने उर्वरित शिक्षकांच्या चाचणी झाली नव्हती. आता शाळा सुरू करताना ज्यांच्या चाचण्या झाल्या त्यांच्या पुन्हा चाचण्या होणार नाही. मात्र आता त्या वेळी ज्यांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे व आता ज्यांची तपासणी होऊन अहवाल पाॅझिटिव्ह येतील त्यांना विलगीकरणात रहावे लागणार आहे.
पुढील निर्णयाकडे लक्ष
२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या सूचना होत्या. मात्र त्या वेळी स्थानिक परिस्थिती पाहून दिवाळीनंतर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने २३ पासून शाळा सुरू होऊ शकल्या नाही. आता ८ पासून शाळा सुरू करावयाच्या असल्याने त्या विषयी कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. मात्र अजून दोन दिवसात परिस्थिती पाहून काय निर्णय होतो, या कडेही सर्वांचे लक्ष आहे.
शाळा सुरू करण्यापूर्वी अशा आहेत सूचना
- इयत्ता नववी ते १२वीपर्यंत शिकविणारे सर्व शिक्षक, कर्मचारी यांची चाचणी करून घेण्यात आली आहे की नाही, त्यात ते पॉझिटिव्ह आढळलेल्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे की नाही, याची खात्री ख करावी लागणार
- विद्यार्थी शाळेत येण्यासाठी पालकांनी संमतीपत्र दिले आहे की नाही, याची खात्री करावी
- शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण, थर्मल गणद्वारे तपासणी, जंतूनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तुंची उपलब्धता करून घेण्यात आली आहे की नाही, याची खात्री करावी.
- विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था सुरक्षित अंतर ठेवून केल्याची खात्री करावी
- पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली की नाही, याची खात्री करावी.