जळगाव : आठ महिन्यांच्या प्रदीर्घ टाळेबंदीनंतर शाळांचे दरवाजे मंगळवारपासून विद्यार्थ्यांसाठी खुले होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळपासून शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये वर्ग स्वच्छ करण्यासाठी कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होती़ सायंकाळपर्यंत ही लगबग सुरू होती. त्यामध्ये वर्गांच्या साफसफाईसह निर्जंतुकीकरण करणे, सॅनिटायझर बॉटल वर्गखोल्यांमध्ये ठेवणे तसेच बाकांची स्वच्छता करणे आदी कामांसह सर्व तयारी व नियोजन सुरू होते.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहता, जिल्हा प्रशासनातर्फे ८ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शिक्षकांची कोरोना चाचणी करीत पालकांकडून संमतीपत्रही मागवून घेण्यात आलेले आहेत.
शाळांमध्ये केले वर्गांचे निर्जंतुकीकरण
मंगळवारी शाळा सुरू होणार असल्यामुळे नूतन मराठा महाविद्यालय, मु. जे. महाविद्यालय, बेंडाळे महाविद्यालय, नंदिनी विद्यालय, मनपाची कन्या चौबे शाळा यांसह शहरातील विविध शाळांमध्ये सकाळपासून शासनाच्या परिपत्रकानुसार वर्ग उघडून स्वच्छता केली. फवारणी करून वर्गांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले़ काही शाळा, महाविद्यालयांमधील वर्गखोल्या तब्बत आठ महिन्यांनंतर उघडल्यामुळे प्रचंड धूळ, जाळ्या आढळून आल्या. त्याची स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली.
प्रवेशद्वारावर मोजले जाणार तापमान आणि पल्स
शाळा सुरू करण्यासंदर्भातील शाळा व्यवस्थापन समिती व पालक-शिक्षक संघांच्या बैठका झाल्या आहेत. बहुतांश शाळांची तयारी पूर्ण झाली आहे. शाळेच्या प्रवेशाद्वारावर विद्यार्थ्यांचे तापमान आणि ऑक्सिजनची पातळी मोजली जाणार आहे. त्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर पाळले जाईल, याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
गटशिक्षणाधिकारी देणार शाळांना भेटी
मंगळवारपासून सुरू होणाऱ्या शाळांना गटशिक्षणाधिकाऱ्यांना भेटी देणे अनिवार्य आहे. १ गटशिक्षणाधिकारी, ५ शिक्षण विस्तार अधिकारी, ११ केंद्रप्रमुख शहरासह ग्रामीण भागातील शाळांना भेटी देणार आहेत़ विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती, विद्यार्थी, पालकांचा प्रतिसाद, कोरोना प्रतिबंधक उपाय आदींची माहिती ते घेतील़ दरम्यान, काही दिवसांपूर्वी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने शाळांची भेटी देऊन पाहणी देखील पूर्ण केली आहे.
-कोट
मंगळवारपासून शाळांना सुरुवात होणार आहे़ विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काय उपाययोजना कराव्यात, त्याबाबत शाळांना सूचना दिल्या आहेत. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील ५२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची संमतीपत्रे दिली आहेत. प्रत्यक्ष विद्यार्थी शाळेत आल्यानंतर विद्यार्थीसंख्या कळेल.
- बी. जे. पाटील, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग
पाॅईंटर
दिवसाआड वर्ग अन् चार तासिका
- नववी ते बारावीपर्यंतच्या शाळांमध्ये दिवसाआड वर्ग आणि चार तासिकांचे नियोजन केले आहे. इंग्रजी, गणित, विज्ञान, भाषा या विषयांचे अध्यापन केले जाणार आहे.
- एका बाकावर एकच विद्यार्थी बसणार आहे. एका इयत्तेत ३० विद्यार्थी असतील तर पंधरा-पंधरा विद्यार्थ्यांचे बॅच बनवून दोन वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना बसविले जाईल.
- बहुतांश शाळांमधील पालक-शिक्षक संघाच्या बैठका झाल्या आहेत.
नववी ते बारावीपर्यंतची जिल्ह्यातील स्थिती
नववी ते बारावी शाळा - ८५७
नववी विद्यार्थी - ७६,३५८
दहावी विद्यार्थी - ७०,७५३
अकरावी विद्यार्थी - २९,६६७
बारावी विद्यार्थी - ३०,३१७
एकूण विद्यार्थी - २,०७,०९५
एकूण शिक्षक - १३,३८६