स्टार १०८६
सुनील पाटील
जळगाव : कोरोनाचा सर्वच क्षेत्राला फटका. अनेक क्षेत्रात ‘वर्क फ्रॉम होम’ हे सूत्र लागू झाले. शिक्षण क्षेत्राची तर अजूनही त्यातून सुटका झालेली नाही. शाळा, कॉलेज व क्लासेस ऑनलाइन सुरू करण्यात आले आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी अनेक फुकटचे ॲप कार्यान्वित झालेले आहेत. काही दिवसांपासून हेच ॲप शाळा व पालकांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. बऱ्याचदा ऑनलाइन वर्ग सुरू असताना अश्लील मेसेज, व्हिडिओ अचानक सुरू होतात. सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा झाले आहेत. चुकीचे प्रकार घडत असल्याने पालक, विद्यार्थी, शिक्षक यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गेल्या दीड वर्षापासून ऑनलाइन शिक्षण सुरू असल्यामुळे पालकांना नाइलाजाने विद्यार्थ्यांना नवीन मोबाइल घेऊन द्यावे लागत आहेत. विद्यार्थी कुतूहलापोटी व उत्सुकतेपोटी लिंकला छेडतात. कधी अनावधानाने, तर कधी मुद्दाम विद्यार्थी व्हिडिओ ग्रुपवर सेंड करतात. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाही त्याचा त्रास होतो. पालकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
शाळांनी ही घ्यावी काळजी
ऑनलाइन वर्ग सुरू होण्याआधी अर्धा किंवा एक तास आधी त्याची लिंक द्यावी. तीदेखील विद्यार्थी वगळता कुठेही शेअर होता कामा नये. रोजच्या रोज नवीन मीट कोड अपडेट करावा. शाळांनी प्रत्येक विद्यार्थ्याचा आयडी तयार करावा. इतर कोणालाही त्याचे ॲक्सिस देऊ नयेत. गोपनीयतेचा भंग होणार नाही यासाठी शिक्षकांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. एखादा शिक्षक जर ऑनलाइन वर्ग घेत असेल, त्या शिक्षकाला वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची ओळख असायला हवी. ऑनलाइन वर्गात खोड काढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत चौकशी होण्याची गरज आहे.
पालकांनी दक्ष राहण्याची गरज
आपला पाल्य खरोखर ऑनलाइन शिक्षण घेत आहे का?, की शिक्षणाच्या नावाखाली इतरत्र चॅटिंग, गेम खेळत आहे, याबाबत पालकांनीच दक्ष असणे गरजेचे आहे. बहुतांश विद्यार्थी गेमच्या आहारी गेलेले आहेत. शिक्षण नावालाच करतात. मुलांचे चुकीच्या गोष्टीबाबत समुपदेशन करणे गरजेचे आहे. शक्यतो ऑनलाइन वर्गानंतर मुलांकडे मोबाइल देऊच नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
असेही घडू शकते
शहरातील एका नामांकित शाळेच्या ऑनलाइन शिक्षणात कोणी तरी अश्लील मेसेज व व्हिडिओ व्हायरल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत शाळेने सायबर पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. दहावीनंतर मुलांमुलींना बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टींची जाण असते. ऑनलाइन जितके फायदे तितकेच तोटे आता निदर्शनास येत आहेत.
कोट..
शाळांनी रोज नवीन लिंक अपडेट करावी. तीदेखील वर्ग सुरू होण्याच्या किमान एक तास आधी ग्रुपवर टाकावी. लिंक व कोड कोणालाही देऊ नये. विद्यार्थ्यांनी देखील लिंक इतर कुठे शेअर करू नये. अनोळखी व्यक्ती आढळली तर लगेच त्याला डिलीट करणे अपेक्षित आहे. ॲडमीन व पालक यांनी देखील तितकीच खबरदारी घ्यावी.
-बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे