लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेच्या १८२० शाळा आहेत. मात्र त्यापैकी एकाही शाळेला मुख्याध्यापकाची स्वतंत्र खोली नाही. ही संकल्पनाच शाळा बांधकाम करताना केली जात नसल्याचे समोर आले आहे. बहुतांश शाळांमध्ये फक्त एकच खोली शाळा व्यवस्थापनासाठी आहे. त्याच ठिकाणी मुख्याध्यापक देखील बसतात आणि इतर शिक्षकांच्या खुर्च्या ठेऊन तेथेच स्टाफ रुमची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा परिषदेची एकच माध्यमिक शाळा जळगाव शहरात आहे. या विद्यानिकेतनमध्ये मुख्याध्यापक कक्ष, स्वतंत्र स्टाफ रुम आहे. मात्र अशी सुविधा प्राथमिक शाळांमध्ये नाही. बहुतेक गावांमध्ये वर्ग खोलीतच मुख्याध्यापकांचे काम चालते. किंवा वर्ग खोल्या जास्त असतील. तर तेथे एक स्वतंत्र खोली ही स्टाफ रुम म्हणून वापरली जाते.
शिक्षक संख्या कमी
जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये मुळातच पटसंख्या कमी असेल तर तेथे दोनच शिक्षक नियुक्त केले जातात. किंवा तीन शिक्षकांची नियुक्ती होऊ शकते. त्यामुळे तेथे स्वतंत्र स्टाफ रुम आणि मुख्याध्यपकाची स्वतंत्र खोली नसते.त्यामुळे एकाच खोलीत वर्ग आणि त्याचखोलीत शाळेचे दप्तर असा प्रकार होतो. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. विद्यार्थ्यांना त्यांच्याच हक्काच्या वर्गात वावरताना अडचणी येतात.
जिल्हापरिषदेच्या शाळा आधीच जुनाट आहेत. त्या कोंदट खोल्या आणि त्यातच असलेले शाळेच्या
कागदपत्रांचे मोठे मोठे कपाटे यामुळे मुलांना वावरतांना कमी जागा मिळते.
शिक्षकांसमोर अडचणी
बहुतांश शाळांना स्वतंत्र वर्ग खोल्या नसल्याने शिक्षकांनाही आपली कामे वर्गातच बसुन करावी लागत आहे काही वेळा शाळांमध्ये खोली नसल्याने एक शिक्षक वर्गात शिकवत असतात. तर दुसरे वर्गाच्या बाहेर व्हरांड्यात बसून शाळेतील इतर कामे करत असतात.
आकडेवारी - जिल्हापरिषदेच्या एकुण शाळा १८२७