'फी'मध्ये 'सूट'ची मागणी : पालकांना आर्थिक भुर्दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात सर्व माध्यमांच्या काही शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. प्रत्यक्ष शाळा बंद; पण ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू असल्या तरी विद्यार्थ्यांकडून फी मात्र नियमित शाळेइतकीच घेतली जात आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे शाळांनी शुल्कामध्ये सवलत द्यावी, अशी मागणी होत आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाही शाळेतील किलबिलाट ऐकायला मिळाली नाही. जिल्ह्यातील शैक्षणिक सत्र १५ जूनपासून झाले आहेत. काही शाळांचे वर्ग त्याआधीच ऑनलाइन पध्दतीने भरले. कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्यामुळे आधीच पालकांना ऑनलाइन शिक्षणाबाबत कल्पना देण्यात आली होती. त्यातच विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याची लगबग सुरू झाली; परंतु प्रवेश घेत असताना पालकांसमोर एकच प्रश्न येतो, तो म्हणजे शाळेच्या फीचा. यंदाही ऑफलाइन शाळा नाहीत. तरीदेखील शाळांकडून ऑनलाइन क्लासची फी न घेता पूर्ण फी घेतली जात आहे. ऑनलाइन शाळा असतानाही फी तेवढीच कशी काय, असा प्रश्न अनेक पालकांना पडला आहे. तसेच शैक्षणिक शुल्कासाठी मुलाचा प्रवेश थांबवला तरी पालक शाळेची तक्रार करू शकत नाहीत. कारण मुलाचे भवितव्य त्या शाळेच्या हातात असते. त्यामुळे शिक्षण विभागाने तक्रारीची वाट न पाहता, चौकशी करणे आवश्यक आहे, असेही पालकांचे म्हणणे आहे.
शिक्षण विभागाच्या आदेशाकडे दुर्लक्ष
पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्काची पूर्तता न केल्याने त्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शैक्षणिक लाभापासून वंचित ठेवता येत नाही; परंतु काही ठिकाणी फी भरल्यानंतरच विद्यार्थ्यांना या क्लाससाठी प्रवेश दिला जात आहे. वास्तविक फी रखडल्याच्या कारणावरून कोणालाही प्रवेश नाकारू नये व फी भरण्यासाठी सवलत देण्यात यावी, असे शिक्षण विभागाचे निर्देश असतानाही त्याकडे काही शाळांकडून दुर्लक्ष होत आहे.
ऑनलाइनमुळे असा वाचतो शाळांचा खर्च
ऑनलाइन शिक्षण सुरू असल्यामुळे शाळांचा वीजबिल, पाणीबिल, सफाई खर्च, सुरक्षेचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे. याबरोबरच अनेक खासगी शाळा वाहतूक, लॅब फी, लायब्ररी फीचा खर्चही मुलांकडून वसूल करत आहे.
------
मंगळवारपासून शाळांना सुरुवात झाली आहे. शैक्षणिक शुल्कासाठी कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांची अडवणूक करता येत नाही. फी भरण्यासाठी सवलत देण्यात यावी, अशी तरतूद आहे, तसेच पालक तक्रारसुध्दा करू शकतात.
- सतीश चौधरी, गटशिक्षणाधिकारी, जळगाव
------
शिक्षकांचा पगार हा शाळेचा मुख्य खर्च आहे; पण अनेक पालकांनी फी न भरल्यामुळे शिक्षकांचे पगार थकले आहेत. ऑनलाइन अध्यापनासाठी शिक्षक शाळेत येतात, त्यामुळे वीज खर्चदेखील शाळेला द्यावा लागतो. विनाअनुदानित शाळांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे, त्यात पालकांनी फी न भरल्यामुळे शाळा विक्रीला काढल्या आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील सुमारे शंभर शाळांचा समावेश असेल.
- अरविंद लाठी, कार्याध्यक्ष, शैक्षणिक संस्थाचालक संघटना