जळगाव : शाळेत जाणा-या बहिणीला थांब्यावर सोडून माघारी फिरताच भरधाव वेगाने आलेल्या रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या बसने दुचाकीवरून जाणा-या पलक अनिल कोरानी (१६, रा.आदर्श नगर, जळगाव) या विद्यार्थिनीला उडविल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजता डीमार्टनजीक असलेल्या मोहाडी फाट्याजवळ घडली. या अपघातात पलक गंभीर जखमी झाली असून, तिला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पलक कोरानी ही शिरसोली रस्त्यावरील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर लहान बहीण आर्ची आठवीला याच शाळेत शिक्षण घेत आहे. आर्ची ही मोहाडी रस्त्याजवळील थांब्यावरुन शाळेच्या बसने जाते. त्यासाठी पलक ही दुचाकीने (एमएच-१९ सीएम/६६६०) आर्चीला सोडण्यासाठी आली होती. थांब्यावर तिला सोडून बसमध्ये बसविले, त्यानंतर लगेच माघारी फिरली असता डी मार्टकडून विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या शाळेच्याच स्कूल बसने (एमएच-१९ वाय/६२०१) दुचाकीला उडविले. त्यात पलक ही दुचाकीसह बसच्या पुढच्या चाकाखाली आली.पलक हिला डोक्याला व कानाजवळ मार लागला आहे. दुस-या दवाखान्यातून तातडीने सिटी स्कॅन करण्यात आले. प्रकृती गंभीर असली तरी धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नशीब बलवत्तर म्हणून पलक या अपघातातून बचावली आहे. दरम्यान, दहा वाजता पोलिसांनी घटनास्थळावरून बस व दुचाकी ताब्यात घेतली.
बहिणीला सोडून परतणाऱ्या विद्यार्थिनीला स्कूल बसने उडविले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 12:35 PM