लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याचा दावा शिक्षण विभाग करित आहे़ मात्र, प्रत्यक्षात राज्यातील १ लाख शाळांपैकी ७१ हजार शाळांमध्ये इंटरनेट सुविधाचं नसल्याची बाब समोर आली आहे. याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये सुध्दा इंटरनेट नसल्यामुळे शिक्षकांना इंटरनेटसाठी स्वत:चा मोबाईल डेटा खर्च करावा लागत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षापासून शाळा बंद आहेत़ मात्र, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण देण्यात यावे, अशा सूचना शासनाकडून शाळांना देण्यात आल्या होत्या. शाळांनी विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले. पण, ग्रामीण भागातील नेटवर्कची अडचण तसेच काहींकडे सुविधाचं नसल्याने अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित रहावे लागले़ आता तर राज्यातील एक लाख शाळांपैकी ७१ हजार शाळांमध्ये इंटरनेट सुविधाचं नसल्याची बाब यु-डायस प्लसच्या ताज्या अहवालातून समोर आली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १ हजार ८२८ शाळा आहेत, यामधील बहुतांश शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे शिक्षकांना इंटरनेटसाठी स्वत:चा मोबाईल डाटा खर्च करावा लागत आहे़ तसेच काही शाळांनी लोकसहभागातून तर काही शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्वत: च्या खर्चातून इंटरनेट सुविधा उभी केली आहे.
शिक्षकांना मोबाईलचा आधार
विद्यार्थ्यांना मोबाईलद्वारे शिक्षण दिले जात आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन सुविधा नाही किंवा मोबाईल नाही, अशा विद्यार्थ्यांच्या घरी जावून अभ्यास दिला जातो व तो करून घेतला जातो.
- सोमनाथ पाटील, शिक्षक, जळकेतांडा जिल्हा परिषद शाळा
-------
निमछाव हे गाव सातपुड्याच्या पायथ्याची गाव असून या ठिकाणी सर्वाधिक आदिवासी बांधवांची वस्ती आहे. त्यांच्याकडे ऑनलाईन सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी जावून अभ्यास दिला जातो. एका ठिकाणी विद्यार्थ्यांना जमवून त्यांना अध्यापन केले जाते. तसेच मोबाईलद्वारे त्यांना शैक्षणिक व्हीडिओ दाखविले जातात.
- सुशील पाटील, शिक्षक, निमछाव जिल्हा परिषद शाळा
००००००००००००००
ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय रे भाऊ
घरात साधा मोबाईल आहे़ तो देखील वडील कामावर घेवून जातात. त्यामुळे आॅनलाइन शिक्षण मिळत नाही. शिक्षकांकडून गट पध्दतीद्वारे शिक्षण दिले जाते.
- संदीप बारेला, विद्यार्थी
-------
मोबाईल आहे, पण नेटवर्क मिळत नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणात व्यत्यय येतो. दररोज वस्तीवर येवून शिक्षकांकडून अभ्यास दिला जातो. लवकरात लवकर प्रत्यक्ष शाळेला सुरूवात व्हावी.
- रितेश बारेला, विद्यार्थी
०००००००००००००
शिक्षण विभागाकडे माहितीचं नाही...
जळगाव जिल्ह्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. दरम्यान, किती शाळांनी ही सुविधा नाही. याबाबत शिक्षण विभागाकडे सुध्दा माहिती उपलब्ध नाही. दुसरीकडे मागील वर्षी काही महिन्यांसाठी शाळा सुरू झाल्या होत्या. त्यावेळी तब्बल १ लाख विद्यार्थ्यांकडे आॅनलाइन सुविधाचं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. आताही ही परिस्थिती कायम आहे.
००००००००००००
जिल्ह्यातील एकूण शाळा - ३३९९
जिल्हा परिषद शाळा - १८२८
शासकीय शाळा - ३१
अनुदानित शाळा - ९६२
विनाअनुदानिब शाळा - १५६
०००००००००००००००
जिल्ह्यातील एकूण शिक्षक - २६६९७
जिल्हा परिषद शिक्षक - ७३८९
शासकीय शिक्षक - ३५८
अनुदानित शिक्षक - १३९०५
विनाअनुदानित शिक्षक - १३३३