अमळनेर : दीड वर्षापासून विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा आनंद हिरावला गेला होता. आपली भावी पिढी आणि गाव शाबूत ठेवण्यासाठी सर्व शाळा सुरू व्हाव्यात ही अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धीवरील मरगळ झटकण्यासाठी शाळा सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी मुख्याध्यापक, ग्रामसेवक व सरपंचाच्या संयुक्त बैठकीत केले.
तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना शून्य असला तरी ६४ पैकी फक्त ३७ ग्रामपंचायतींनी शाळा सुरू करण्याबाबत ठराव दिले होते. त्या अनुषंगाने आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जी. एस. हायस्कूल मध्ये सरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटना प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर संस्थाचालक जयवंतराव पाटील, रवींद्र पाटील, गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन, विस्तार अधिकारी एल. डी. चिंचोरे, शिक्षण विस्तार अधिकारी पी. डी. धनगर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा कौन्सिल सदस्य तुषार बोरसे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आर. जे. पाटील, केंद्रप्रमुख शरद सोनवणे हजर होते.
यावेळी संजय पाटील, जयंतराव पाटील यांनी आपली मते आणि समस्या मांडल्या. नरेंद्र पाटील यांनी शाळांना स्वच्छतेसाठी थर्मल गन,सॅनिटायझर देण्यास निधीची तरतूद नसल्याचे मांडले, तर सरपंच प्रेमराज चव्हाण यांनी ५ वी पासूनच शाळा सुरू करा, अशी मागणी केली व शाळेसाठी सर्व साहित्य उपलब्ध केल्याचे सांगितले. ग्रामसेवक एस. डी. सोनवणे यांनी स्वतंत्र निधी खर्च करण्याची तरतुदींची मागणी केली. तर नगावचे महेश पाटील यांनी १५ व्या वित्त आयोगातून खर्चास परवानगी देण्याची मागणी केली. यावर आमदार पाटील यांनी सध्या ग्रामपंचायतींनी मार्ग काढून मुलांच्या सुरक्षेसाठी शाळांना सुविधा पुरवाव्यात नंतर आमदार निधीतून अडचणी दूर केल्या जातील, असे सांगितल्याननंतर सर्वांनी शाळा सुरू करण्यास होकार दिला. यावेळी विद्यार्थ्यांना जिल्हा बँकेत शून्य बॅलन्सवर खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा बँक संचालक म्हणून अनिल पाटील यांचा व सुटीत साने गुरुजींच्या कथा ऐकवून मुलांवर संस्कार घडवल्याबद्दल दत्तात्रय सोनवणे यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय सोनवणे यांनी तर आभार संजय पाटील यांनी मानले.