ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 9 - देशात आज सरकार पाणी वाचवा, वृक्ष लागवड, पर्यावरण रक्षणाचा नारा देत आहे. मात्र ही गरज महाराणा प्रताप यांनी साडेचारशे वर्षापूर्वीच ओळखली आणि कृषी व जलव्यवस्थापनाची नीती त्यावेळीच अवलंबविली. त्यांनी केवळ हाती तलवारच न ठेवता वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवला आणि त्या वेळी दुष्काळाच्या झळा सोसणा:या मेवाडवासीयांना शेतीचा पुरस्कार करण्याचा मंत्र देत देशात पर्यावरण रक्षण, नदीजोड प्रकल्पाचा श्रीगणेशा महाराणा प्रताप यांनीच केला. त्यांच्या या वैज्ञानिक दृष्टीकोनाने देशाला वेगळी दिशा दिल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध इतिहासकार डॉ. श्रीकृष्ण जुगनू यांनी केले. जळगाव येथील इतिहास लेखक डॉ. नरसिंह परदेशी यांच्या ‘महाराणा प्रताप एक ऐतिहासिक अध्ययन’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी जळगावात झाले, त्या वेळी ‘महाराणा प्रताप यांची कृषीनीती व जलसंधारणातील योगदान’ याविषयावर डॉ. जुगनू यांचे व्याखान झाले, त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के.बी.पाटील होते. या वेळी दिवेर स्मारकाचे संस्थापक अॅड. नारायण उपाध्याय, अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंग चव्हाण, इतिहासाचे अभ्यासक जी.बी.शहा, पुस्तकाचे लेखक डॉ. नरसिंह परदेशी उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रामकृष्ण पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नरसिंह परदेशी यांनी पुस्तकामागील भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, हलदीघाटीनंतर महाराणा प्रताप यांचे खरे कार्य हे सुरू होते. अनेकांना अजूनही ते माहिती नाही. मी पुस्तक लिहिताना त्यांच्या सर्व गोष्टींचा हा अभ्यास केला. प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटी दिल्या. त्यांचे वास्तव्य कुठे होते त्या ठिकाणी गेलो, मला मिळालेले संदर्भ व प्रत्यक्ष अनुभव यांचाही अभ्यास केला. सामाजिक, आर्थिक, लष्करी इतिहास व कृषीनीती, धार्मिक नीती यांचा सर्व समावेश या पुस्तकात केल्याचे सांगून हे पुस्तक प्ररेणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला व यातून अधिकाधिक नवीन इतिहासकारही निर्माण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात डॉ. के.बी.पाटील म्हणाले की, महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज यांचे नाव समोर आले आपल्याला स्फुरण येते. या दोन्ही राजांनी आपल्या प्रजेची अगोदर चिंता केली. महाराणा प्रताप यांनीदेखील हलदी घाटीतील युद्धानंतर आपल्या लोकांवर आलेल्या परिस्थितीची चिंता केली.
ज्यांची नावे संपली त्यांची राजवाडे टिकलीआज महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-किल्ले अथवा त्यांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणा:या वास्तूंची दुरवस्था असल्याची खंत डॉ. के.बी. पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. ज्यांचे नावं संपली त्यांचे राजवाडे टिकले, मात्र या महान व्यक्तींच्या वास्तूंकडे दुर्लक्ष होत असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. वृक्ष छायादार नव्हे फळदार हवे डॉ. श्रीकृष्ण जुगनू पुढे म्हणाले की, महाराणा प्रताप यांनी जगाला विश्ववल्लभ पुस्तकातून वैश्विक दृष्टीकोन दिला. आपले सगळे हे शेती आणि नीतीवर आहे, असा महाराणा प्रताप यांचा नारा होता. प्रदेशात सगळ्यात जास्त वृक्ष हवे. तेदेखील केवळ छायादार नव्हे तर फळदार हवे, यावर त्यांचा भर होता. बाहेरुन कोणीही आल्यास येताना वृक्ष आणावे ही आज्ञाच त्यांनी केली होती. आपला प्रदेश हा हिरवागार हवा तर फळेही असे लावा जे सगळ्यांच्या उपयोगी पडतील, आपल्या पाण्याचा साठा हा वाचवायला हवा, यासाठी तलावांची निर्मिती त्यांनी केली. कमी खर्चात बांध कुठे बांधावा हेदेखील त्यांनी सूचविले. त्यांच्या जलसंधारणाच्या या उत्कृष्ट नीतीमुळे जनतेला आधार मिळाला तर झाडांची चिकीत्सा कशी करायला हवी याचाही अभ्यास त्यावेळी त्यांनी केला असे डॉ. जुगनू यांनी नमूद केले. महापुरुषांचे साहित्य जगतेजी.बी.शहा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माणसे जगत नाहीत मात्र महापुरुषांचे साहित्य जगते. आजही वर्गात चिकित्सक अभ्यास शिकविला जात नसल्याचे सांगून त्यांनी महाराणा प्रताप हे काळाबरोबर चालणारे होते, असा उल्लेख केला. सूत्रसंचालन जयदीप पाटील यांनी केले. यावेळी शहर व जिल्ह्यातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.