लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारांबाबत नियोजन करण्यात आले असून सीटू व सीथ्री कक्षात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासह बाह्य रुग्ण विभागात कोरोनाचे स्क्रिनिंग सुरू करावे, अशा सूचना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सर्व विभागप्रमुखांना दिली आहे. दरम्यान, प्रमुख डॉक्टरांच्या सुट्या रद्द करून पत्र पाठवून बोलवून घेण्यात आले आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात अचानक रुग्णवाढ समोर आले आहेत. यात पूर्वीपासूनच्या तीन स्तरावरील उपचार पद्धती पुन्हा कार्यान्वित करण्यास प्रशासनाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. डिसेंबर महिन्यात नॉन कोविड झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काही दिवसांपूर्वी सीटू आणि सी थ्री हे कक्ष बंद करण्यात आले होते. मात्र, हळूहळू रुग्णसंख्या वाढल्याने हे कक्ष पुन्हा सुरू करण्यात आले असून या ठिकाणी २५ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. आगामी नियोजनसाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी तातडीने सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. यात वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, औषध वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले, स्त्री रोग विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे, औषधशास्त्र विभागाचे डॉ. इम्रान तेली, बालरोग विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोसे आदी उपस्थित होते. सर्व विभागप्रमुखांनी सर्वांच्या संपर्कात राहून, व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून उपचारांबाबत चर्चा कराव्यात, नियमित रुग्णांचा आढावा घ्यावा, यासह येत्या बुधवारी पुन्हा बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल, अशा सूचना डॉ. रामानंद यांनी दिल्या असून यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
हे महत्त्वाचे निर्णय
१ सीटू कक्षात संशयितांवर तर सी थ्री कक्षात बाधितांवर उपचार करावेत. गरज पडल्यास सी १ कक्ष उघडून सुरू करावा. रुग्ण वाढल्यास डॉ.
उल्हास पाटील रुग्णालयात त्यांना स्थलांतरित करावे, गंभीर रुग्णांनाच दाखल करावे, गरज पडल्यास १४ क्रमांकाच्या अतिदक्षता
विभागाबाबत निर्णय घ्यावा
२ बाह्य रुग्ण विभागात कोरेानाचे स्क्रिनिंग करण्यात यावे
३ अत्यावश्यक असतील त्याच शस्त्रक्रिया कराव्यात, रुग्णांना तशी माहिती द्यावी.
४ संसर्ग वाढत असल्याने सर्वांनी सज्ज रहावे, प्रमुख डॉक्टरांनी अत्यावश्यक कारणाशिवाय सुट्या घेऊ नयेत.
५ बुधवारी पुन्हा आढावा घेण्यात यावा.