लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरातील वाढीव भागातील राहून गेलेल्या १६५ कॉलन्यांमधील कामाच्या प्रस्तावावरील स्क्रुटीनीचे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून परवानगी मिळाल्यानंतर या कामाला आता लवकरच सुरुवात होणार आहे. अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात केला नव्हता या भागांचाही समावेश करण्याचा सूचना पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर या कॉलन्यांच्या कामासाठी ४२ कोटींचा डीपीआर तयार करून फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत या कामाच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती.
शहरात सुरू असलेल्या अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, या योजनेचे आतापर्यंत नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामाची मुदत ३१ मार्चपर्यंत होती. ही मुदत आता संपल्याने पुन्हा वाढीव भागासाठी महापालिकेकडे मक्तेदाराकडून मुदतवाढीसाठी प्रस्ताव दिला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाढीव कामाची प्रक्रिया पूर्णपणे वेगळी राहणार असून, यासाठी शासनाकडून पूर्ण योजनेला अजून मुदतवाढ मिळू शकते अशी माहिती मनपा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा
महापालिकेने अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी १६५ कॉलन्यांचा नव्याने डीपीआर तयार केला असला तरी अंतिम मंजुरीसाठी या प्रस्तावाला मोठी प्रदक्षिणा घालावी लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यात डीपीआरला महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. मजिप्राकडून स्क्रुटीनीचे सर्व काम पूर्ण झाले असून, आता तांत्रिक मंजुरीची प्रतीक्षा आहे. त्यानंतर राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. शासनाची परवानगी मिळाल्यानंतरही निविदा प्रक्रिया राबवायची की सध्या सुरू असलेल्या मक्तेदाराकडून हे काम करवून घ्यायचे याबाबतीत देखील निर्णय मनपा प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.
या भागांचा समावेश
शहरातील अनेक वाढीव भागातील कॉलन्यांचा समावेश अमृत योजनेच्या डीपीआरमध्ये करण्यात आला नव्हता. यामध्ये वाघनगर परिसर, रामानंद नगरातील वाढीव भाग, खोटे नगर परिसरातील विस्तारित भाग, चंदू अण्णा नगरातील विस्तारित भाग, पवार पार्क, निमखेडी शिवारातील विस्तारित भाग, अयोध्या नगर विस्तारित भाग, केसी पार्कच्या पुढील महादेव नगर, खेडी परिसर, राजाराम नगर, सत्यम पार्क परिसरातील वाढीव भाग, ममुराबादकडील वाढीव भागाचा समावेश आहे. दरम्यान, या भागातील कामांना एप्रिल-मे महिन्यांत सुरुवात होण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे ‘अमृत’च्या कामावर झाला परिणाम
अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेच्या कामावर कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. गेल्यावर्षी मार्च ते जून २०२० दरम्यान या दोन्ही योजनांचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते. तसेच लॉकडाऊन उघडल्यानंतरदेखील कामाची गती मंदावली होती. नोव्हेंबर महिन्यानंतर कामांना वेग आला होता; मात्र पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजना व पाणीपुरवठा योजनेच्या कामावर परिणाम झालेला दिसून येत असून, अनेक ठिकाणी काम सध्या बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. भुयारी गटार योजनेच्या कामाची मुदत सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे.