रावेर : पंचायत समिती कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत साकारल्यानंतर तब्बल ५० ते ६० वर्षांपासून जीर्ण, जुने व मोडकडीस आलेले व धूळखात पडलेले नांगरधारी बळीराजा व दिमतीला तगारी डोईवर घेऊन असलेली त्याची अर्धांगिनी असे तालुक्यातील कष्टकरी केळी बागायतदार शेतकरी कुटुंबाचे चित्र प्रतिबिंबित करणाऱ्या शिल्पाचे अखेर पंचायत समिती सदस्य जितेंद्र पाटील यांच्या तगाद्यामुळे रुपडे पालटल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या जनतेसाठी ते लक्षवेधी ठरले आहे.
सन १९६७ साली रामकृष्ण पाटील हे पंचायत समिती सभापती, तर दुलबा पाटील हे उपसभापती असताना त्यांनी रावेर पंचायत समिती कार्यालयासमोर बारे पद्धतीने केळी उत्पादन घेणाऱ्या कष्टकरी " बळीराजा व त्याच्या खांद्याला खांदा लावून चालत असलेली त्याची अर्धांगिनी " अशा तालुक्यातील कष्टकरी केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कष्ट प्रतिबिंबित करणाऱ्या शिल्पाचे अनावरण केले होते.
दरम्यान, तत्कालीन पंचायत समिती कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्याने ती वास्तू पाडून त्याठिकाणी पंचायत समिती कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत साकारण्यात आली. इमारतीचे रुपडे पालटले, पण त्या समोरील कष्टकरी बळीराजाचे शिल्प मात्र धूळ खात राहिल्याची खंत जनमानसातून खटकत होती.
तत्कालीन पं. स. उपसभापती दुलबा पाटील यांचे नातू हे चक्राकार पद्धतीने माजी सभापती व विद्यमान पं. स. सदस्य असलेले जितेंद्र पाटील, त्यांचे सहकारी पं.स. सदस्य दीपक पाटील, योगेश पाटील यांनी शिल्पाच्या खाली असलेल्या कोनशिलेवरील आजोबांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पं. स. आढावा बैठकीत या विषयाकडे लक्ष केंद्रित केले होते.
लॉकडाऊनच्या अंतिम चरणातील शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी जि. प. बांधकाम उपविभागीय अभियंता चंद्रकात चोपडेकर यांच्या माध्यमातून खिरोदा येथील सप्तपदी ललित कला अकादमीचे निवृत्त प्रा. डॉ. अतुल मालखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली या बळीराजाच्या दाम्पत्याच्या शिल्पाचे रुपडे पालटून टाकले आहे.
अनलॉकच्या पहिल्याच दिवशी तब्बल तीन साडेतीन महिन्यात पं. स. कार्यालयाच्या आवारात बदल झाल्याची बाब लक्ष केंद्रित करणारी ठरली आहे. त्यांनी काळ्या मातीत घाम गाळणाऱ्या या बळीराजाच्या दाम्पत्याला राखाडी रंगाची व ब्राँझ धातूच्या रंगछटा साकारल्याने पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या शोभेत भर पडली आहे.
नवीन प्रशासकीय इमारतीच्या पोर्च समोर आग्नेय दिशेला हा पुतळा सद्यस्थितीत असल्याने पोर्च समोर मध्यवर्ती ठिकाणी जि. प. अध्यक्ष रंजना पाटील यांच्या माध्यमातून नवीन ग्रेनाईटचा चबुतरा उभारून त्यावर बळीराजाच्या दाम्पत्याचे शिल्प स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती पं. स. सभापती कविता कोळी व पं.स.सदस्य जितेंद्र पाटील, हरलाल कोळी यांनी दिली.