‘बीएचआर’चे सील उघडले; पण
हार्ड डिस्कमुळे घोडे अडले !
ठेवीदारांना प्रतीक्षाच :पुणे पोलिसांचे तीन पथक तळ ठोकून
जळगाव : ठेवीदारांची फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीएचआर या पतसंस्थेचे सील उघडले आहे. कार्यालयातील संगणकातील डेटा जप्त असल्याने अवसायकांना अजूनही कामकाज करता येणार नाही, त्यामुळे ठेवीदारांची प्रतीक्षा कायम आहे.
पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी सुचेता खोकले यांच्यासह तीन पथके जळगाव दाखल झालेली आहे. सोमवारी सायंकाळी ही पथके दाखल झाली .त्याच दिवशी अवसायक चैतन्य नासरे यांच्यासमक्ष सील उघडून कार्यालयाचा ताबा त्यांना देण्यात आला. दरम्यान, पुणे पोलिसांचे मात्र अजूनही जळगावात तळ ठोकून असून याच प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडून केली जात आहे.
बीएचआरच्या मुख्य कार्यालयाचे सील उघडण्याचे आदेश पुणे न्यायालयाने ५ मे रोजी दिलेले होते. मात्र, कोरोनाचे कारण सांगून पोलिसांनी सिल उघडलेले नव्हते भाऊसाहेब नासरे यांनी सातत्याने पत्रव्यवहार सुरू ठेवल्याने सोमवारी पोलीस निरीक्षक सुचेता खोकले या जळगाव दाखल झाल्या. सायंकाळी त्यांनी सील उघडून कार्यालयाचा ताबा दिला.
पुणे येथील सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांच्या फिर्यादीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर रोजी अवसायक जितेंद्र कंडारे व इतरांविरुद्ध अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. डिसेंबर महिन्यात पुणे पोलिसांनी संस्थेचे मुख्य कार्यालय सील केले होते.