लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून बाजार परिसरात गर्दी होऊ नये म्हणून नियमावली जाहीर केली आहे. मात्र तरीही शहरातील अनेक दुकानांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून आखून देण्यात आलेल्या नियमांची पायमल्ली मोठ्या प्रमाणात होत आहे. सोमवारी देखील शहरातील चित्रा चौक व बेंडाळे चौक परिसरातील अनेक दुकानांमध्ये प्रमाणाबाहेर गर्दी आढळून आली. यामुळे मनपा उपायुक्त संतोष वाहूळे त्यांच्या पथकाने पाच दुकाने सील केली आहेत.
सोमवारी शहरातील अनेक दुकानदारांनी सोशल डिस्टंसिंग व दुकानातील गर्दीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. चित्रा चौक मधील दोन दुकानांमध्ये ५० पेक्षा अधिक ग्राहक असल्याचे आढळून आले. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून या दुकानदारांना याआधी देखील नोटीस बजावली होती. मात्र मनपाच्या सूचना नंतरही दुर्लक्ष केल्याने चित्रा चौकातील दोन्ही दुकाने सील करण्यात आली आहेत. यासह बेंडाळे चौकातील तीन दुकाने देखील सील करण्यात आले आहेत.
अनधिकृत हॉकर्सवर देखील कारवाई
शहरातील गणेश कॉलेज चौक, ख्वाॅजामिया चौक, तसेच बळीराम पेठ, सुभाष चौक भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे या ठिकाणी नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अनेक विक्रेत्यांनी तोंडावर मास्क देखील न लावल्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून २२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच अनेकांचा माल देखील यावेळी जप्त करण्यात आला. यावेळी काही हॉकर्स कडून महापालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून वाद देखील केला. मात्र महापालिका प्रशासनाने याबाबत कारवाई सुरूच ठेवले. तसेच शहरातील अनेक उपनगरांमध्ये देखील महापालिकेच्या पथकांकडून गल्लीबोळात भरणाऱ्या बाजारावर देखील कारवाई केली जात आहे.
बँक ऑफ बडोदाच्या शाखेला ५० हजार रुपयांचा दंड
शहरातील नवी पेठ भागातील बँक ऑफ बडोदा मध्ये सोमवारी महापालिकेच्या पथकाने पाहणी केली असता, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. तसेच बँक प्रशासनाकडून देखील सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याबाबत ग्राहकांना कोणत्याही सूचना दिल्या जात नसल्याचे आढळून आले. यामुळे महापालिका प्रशासनाने बँक ऑफ बडोदा प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून ५० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. तसेच नियमांची पायमल्ली केल्याबद्दल गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये ? याबाबत कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे.