मनपाची कारवाई : रेल्वे स्टेशनवरील दोन दुकानांवरही कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा अतिक्रमण निर्मू लन विभागाकडून गुरुवारी फुले मार्केट भागातील अनधिकृत हॉकर्सवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान मनपाच्या पथकाकडून माल जप्त होऊ नये म्हणून काही हॉकर्सने आपला माल फुले मार्केटमधील दुकानांमध्ये लपविला. हे मनपा अधिकाऱ्यांचा निदर्शनास आल्यानंतर हॉकर्सचा माल लपविणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करत चार दुकाने सील केली आहेत. यासह रेल्वे स्टेशन परिसरातील दोन दुकानेदेखील मनपाने सील केली आहेत.
मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून दररोज शहरातील विविध भागातील अनधिकृत हॉकर्सवर कारवाईची मोहीम सुरू असून, गुरुवारीदेखील फुले मार्केट, सुभाष चौक, बळीराम पेठ, गणेश कॉलनी चौक भागात हॉकर्सवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी २७ हॉकर्सचा माल जप्त करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता फुले मार्केट भागात मनपाचे पथक पोहचल्यानंतर एकच गोंधळ उडाला. या ठिकाणी हॉकर्स व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये वाददेखील झाले. फुले मार्केटमध्ये १६ हॉकर्सवर कारवाई करण्यात आली. मनपाचे पथक पोहचल्यानंतर अनेक हॉकर्सने आपला माल मार्केटमधील काही दुकानदारांकडे लपवून ठेवला होता. मनपाच्या पथकाने अशा दुकानदारांवरदेखील कारवाई केली असून, मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी चार दुकाने सील केली. तसेच प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासह रेल्वे स्टेशन भागातील दुकानेदेखील सील करण्यात आली.