ब्युटीपार्लरमध्ये गर्दी : लपून छपून व्यवसाय करणारे आता रडारवर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने गुरुवारी शहरात लपून छपून व्यवसाय करणाऱ्या सहा दुकानदारांवर कारवाई केली आहे. सहा दुकाने सील करून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे सर्व व्यवसायांना सकाळी अकरानंतर व्यवसाय बंद करण्याचे आदेश असतानादेखील एका ब्युटीपार्लरमध्ये महिलांची मोठी गर्दी आढळून आल्याने या ब्युटीपार्लरवरदेखील कारवाई करण्यात आली आहे.
मनपा उपायुक्त संतोष वहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने दररोज कारवाईची मोहीम हाती घेतली असून, शहरात सकाळी अकरानंतर लपून छपून व्यवसाय करणारे आता महापालिकेच्या रडारवर आले आहेत. यासाठी महापालिकेकडून वेगवेगळी सहा पथक तैनात करण्यात आली असून, शहरातील विविध भागांमध्ये या पथकाकडून तपासणी सुरू आहे. गुरुवारीदेखील शिवाजी रोड, बळीराम पेठ, एम.जे. कॉलेज परिसर, प्रभात चौक या भागातील दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. यासह बळीराम पेठ व सुभाष चौक भागात अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी सकाळी अकरा वाजेनंतरदेखील दुपारी १२ वाजेपर्यंत आपले व्यवसाय सुरूच ठेवले होते. अशा भाजीपाला विक्रेत्यांवरदेखील महापालिकेचा पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. यासह बुधवारी बजरंग बोगदा परिसरात मनपा कर्मचारी व विक्रेत्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मनपाचा पथकाकडून बजरंग बोगदा परिसरातदेखील पाहणी करण्यात आली. मात्र, या ठिकाणी गुरुवारी दुपारी १२ वाजेनंतर शुकशुकाट पाहायला मिळाला.
मनपा अतिक्रमण विभागाच्या साथीला पोलीस प्रशासनाचे कर्मचारीही होणार तैनात
शहरात जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले असतानादेखील अनेक व्यावसायिक लपून छपून व्यवसाय करत असल्याचे आढळून येत आहे. यासाठी आता जिल्हा प्रशासनाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकाच्या साथीला केली आहे. आधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनीदेखील पाच अंमलदार यांची नियुक्ती मनपा अतिक्रमण विभागाचा सोबत करण्याचे आदेश काढले आहेत. यामध्ये सतीश ठाकरे, नितीन भालेराव, कैलास सोनवणे, शेखर ठाकूर, ज्ञानेश्वर कोळी या अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील विविध भागात या कर्मचाऱ्यांना तैनात करण्याचे आदेशदेखील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले आहेत.