जळगाव : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जिल्हा व तालुका स्तरावर स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून, शाळास्तरावर कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काही नोंदी मोडी लिपीतील असल्याने त्यामधील नोंदींचे नमुनेही शाळांना पाठविण्यात आले आहेत.
शाळांमध्ये उपलब्ध अभिलेखात (जनरल रजिस्टर) दोन टप्प्यात नोंदी शोधायचे निर्देश आहेत. १९४८ पूर्वीचा कालावधी आणि १९४८ ते १९६७ या कालावधीतील सापडलेल्या कुणबी जातीच्या नोंदींची संख्या दररोज सायंकाळी मुख्याध्यापकांच्या सही, शिक्क्यांसह गटशिक्षणाधिकारी यांना कळवायची आहे. शाळांच्या जनरल रजिस्टरमधील बऱ्याच नोंदी मोडी लिपीतील आहेत. ही भाषा माहित असणारे आता कमी आहेत. त्यावर उपाय म्हणून शासनाने मोडी लिपीत कुणबी नोंद कशी केलेली असेल याचे चार नमुने शाळांना पाठवले आहेत. यामध्ये कुणबी, कुनबी, कु, कुणबी सदर आदींचा समावेश आहे. एरंडोल तालुक्यातील कढोलीमध्ये १८८३ ची नोंद सापडली आहे मात्र, जिल्हास्तरावर सर्व तालुक्यांतील नोंदी एकत्र झाल्यानंतर सर्वात जुनी नोंद कोणत्या तालुक्यातील आहे हे स्पष्ट होईल, अशी माहिती मिळाली. सध्या तरी हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी शिक्षक नोंदी तपासण्यात व्यस्त आहेत. कागदपत्रे स्कॅन करा....जनरल रजिस्टरमध्ये तपासणी करताना कुणबी कागदपत्रे आढळून आल्यास त्यांचे स्कॅनिंग करून सांभाळून ठेवण्यास सांगण्यात आले आहे. नोंदी तपासणीचे काम दि. ९ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत.