लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एक लाख रुपये घेऊन कुसुंबा येथील तरुणाशी विवाह केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रफूचक्कर झालेल्या नववधूला शनिपेठ पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. या महिलेने पहिल्या पतीशी संसार सुरू असताना अन्य तरुणासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केल्यामुळे पती मनोरुग्ण झाला होता. त्यानंतर प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रियकराच्या वडिलांनी आत्महत्या केली होती.
जामनेर तालुक्यातील सामरोद येथील कैलास संतोष चावरे हा गेल्या बारा वर्षांपासून जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील बहिणीकडे वास्तव्यास होता. दोन महिलांनी कैलासकडून विवाहासाठी एक लाख रुपयांची रक्कम घेत त्याचा उज्ज्वला गाढे हिच्यासोबत दुुसरा विवाह लावूून दिला होता. परंतु लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू रफूचक्कर झाल्याची घटना ३१ जुलै रोजी घडली होती. त्यानंतर मध्यस्थी महिलांनी पैसे मिळणार नाही, असे सांगताच कैलास चावरेंनी त्या महिलांच्या घराजवळ विष प्राशन केले होते. त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी लीलाबाई रामनारायण जोशी व पदमा सुधाकर खिल्लारे ऊर्फ संगीताबाई रोहिदास भालेराव ऊर्फ संगीता रमेश पाटील यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. तब्बल तीन ते चार महिन्यानंतर उज्ज्वला ऊर्फ संगीता ऊर्फ उजी अनिल गाढे (२५, रा.विवरा, ता.रावेर) या फरार नववधूस पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरातून शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. तिला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.