लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तिसऱ्या सिरो सर्व्हेचा सहा जिल्ह्यांचा अहवाल आयसीएमआरने प्रसिद्ध केला असून यात कोरेाना संसर्गाच्या प्रमाणात सांगली जिल्ह्यानंतर जळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या सिरो सर्व्हेची विशेष बाब म्हणजे १०३ पैकी २३ कर्मचाऱ्यांच्या रक्तात कोरोनाशी लढणाऱ्या ॲन्टीबॉडीज आढळून आल्या आहेत. हे प्रमाण २२. ३ टक्के आहेत.
डिसेंबर महिन्यात आयसीएमआरच्या पथकाने जिल्ह्यात हा तिसरा सिरो सर्व्हे केला होता. यात प्रथमच चोपडा येथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले होते. आरोग्य कर्मचाऱ्यांचा थेट रुग्णांशी संपर्क असल्याने अनेक कर्मचारी बाधितही झाले होते. यात अनेक डॉक्टरांचाही समावेश होता. जिल्हा रुग्णालयातील अनेक वरिष्ठ डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली होती. यातून बरे होऊन डॉक्टर व कर्मचारी पुन्हा सेवेतही रुजू झाले होते. या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग कसा आहे, हे तपासण्यासाठी प्रथमच या सर्वेक्षणात आरेाग्य कर्मचाऱ्यांची तपासणी झाली.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा
२० हजार आरोग्य कर्मचारी
१०३ जणांचे रक्तनमुने संकलित
२३ जणांमध्ये आढळल्या ॲन्टीबॉडिज
२२. ३ टक्के पॉझिटिव्हीटी
४५०० कर्मचाऱ्यांना कोरोना होऊन गेल्याचा अंदाज
ॲन्टीबॉडिज किती दिवस?
कोरोना झाल्यानंतर बरे झाल्यापासून साधारण तीन ते सहा महिने ॲन्टीबॉडीज अर्थात कोरोना विषाणूशी लढणारी तत्त्वे रक्तात कायम राहतात. ही तीन प्रकारची असतात आयजीएम, आयीजए आणि आयजीजी यात प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या ॲन्टीबॉडीज या आयजीजी असतात. सिरो सर्वेक्षणात याचीच तपासणी होते. शिवाय लसीकरणातूनही याच ॲन्टीबॉडिज तयार होणार आहेत, कोरोनाचा संसर्ग किती प्रमणात झाला यावरही ॲन्टीबॉडिजचे प्रमाण ठरते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
राज्यात जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर
सांगली जिल्ह्यात सर्वाधिक ३६.६ टक्के एवढे कोरोना संसर्गाचे प्रमाण असून त्या खालोखाल जळगावात २८.३ टक्के एवढे आहे. यानंतर नांदेड २६, बीड २३.३, अहमदनगर २२.६ परभणी १९ टक्के एवढे प्रमाण या सर्व्हेत समोर आले आहे. याचा अर्थ इतक्या लोकांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या ॲन्टीबॉडिज तयार होऊन गेलेल्या आहेत. कोरेानाच्या दुसऱ्या सर्वेक्षणात जळगाव जिल्हा २५.९ टक्क्यांनी पहिल्या क्रमांकावर होता.