लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. त्यांच्या २८ दिवसानंतरच्या दुसऱ्या डोसचे सोमवारपासून नियोजन करण्यात येणार आहे. यात पुन्हा त्या कर्मचाऱ्यांना एसएमएस पाठवून लसीकरणाला बोलविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचा दुसरा डोस आणि दुसऱ्या टप्प्याचा पहिला डोस हे दोनही लसीकरण सोबत सुरू राहणार आहेत.
जिल्ह्यात १६ जानेवारीला कोरोना लसीकरण सुरू झाले होते. याला रविवारी २८ दिवस पूर्ण होत आहे. दरम्यान, पहिला आणि दुसरा डोस यांच्यात २८ दिवसांचा कालावधी असावा, असा नियम असून २८ दिवसानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस घेता येणार आहे. याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्समध्येही सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण जवळपास आटोपले असल्याचे यंत्रणेचे म्हणणे असून त्यामुळे काही केंद्रांवर संख्या रोडावली आहे. संख्या घटली. जिल्ह्यात शुक्रवारी ६४६ कर्मचाऱ्यांनी लस घेतली यात मुक्ताईनगर, पारोळा, बोदवड या केंद्रावर दहा पेक्षा कमी कर्मचाऱ्यांनी लस घेतली. जीएमसीमध्ये सर्वाधिक ९१ जणांनी लस घेतली. आतापर्यंत १३४११ जणांनी लस घेतली आहे. जीएमसीमध्ये एका डॉक्टरांना लस घेतल्यानंतर साैम्य रिॲक्शन जाणवले होते.
कर्मचारी माहिती देईना
जि. प. , पं. स, नगरपालिका या कर्मचाऱ्यांना लस द्यायची असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी पत्र दिले आहे. मात्र, दहा दिवसांचा कालावधी उलटूनही या कार्यालयांमधील केवळ ५०० कर्मचाऱ्यांची माहिती अद्याप जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाली आहे. साधारण वीस हजारांपर्यंत या कर्मचाऱ्यांची संख्या असेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.