लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविशिल्ड लसीच्या पहिल्या ते दुसऱ्या डोसमध्ये १२ ते १६ आठवड्यांचे अंतर हवे, अशा शासनाच्या मार्गदर्शक सूचना या स्थानिक पातळीवर प्राप्त झाल्या आहेत. आधी हे अंतर ६ ते ८ आठवडे होते, ते कोविशिल्ड लसीसाठी वाढविण्यात आल्याचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी सांगितले.
सद्यस्थितीत केवळ ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस उपलब्ध आहे. शहरात स्वाध्याय भवन व मुलतानी रुग्णालयातही ४५ वर्षावरील नागरिकांच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण होणार आहे. शहरात महापालिकेचे ७ केंद्र असतील. आधी हे दोन केंद्र केवळ १८ ते ४४ वयोगटासाठीच होते. मात्र, ते लसीकरण तूर्तास थांबविण्यात आले आहे. त्यामुळे या केंद्रांवर ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. शनिवारी शाहु महाराज रुग्णालय, नानीबाई रुग्णालय, डी. बी. जैन रुग्णालय, शाहीर अमरशेख रुग्णालय, कांताई नेत्रालय, स्वाध्याय भवन, मुलतानी दवाखाना या महापालिकेच्या सात केंद्रांवर कोविशिल्ड लसीचा ४५ वर्षावरील नागरिकांसाठी दुसरा डोस मिळणार आहे. अशी माहिती डॉ.रावलानी यांनी दिली.
तीन केंद्रावरील लसी संपल्या
जिल्ह्यातील जामनेर, चोपडा, भडगाव या ठिकाणच्या लसी संपल्या आहेत. तर शुक्रवारी जिल्ह्यात कमी प्रमाणात लसीकरण झाले, ७२४ जणांनी पहिला तर १३६६ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला.