लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सद्य:स्थितीत चालू आहे. पाणीपुरवठा योजनेचे जवळजवळ ९० टक्के काम पूर्ण झाले असून, भुयारी गटार योजनेचेदेखील ६० टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. भुयारी गटार योजनेअंतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात ५५ टक्के भाग घेण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात शहरातील उर्वरित भाग घेण्यात येणार असून, यासाठीच्या मलनिस्सारण प्रकल्पासाठी महापालिकेकडे जागा उपलब्ध नसल्याने दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी महापालिकेने अद्याप एकही प्रस्ताव तयार केला नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी महापालिकेसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.
शहरासाठी २०१५ मध्ये अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजना मंजूर झाल्या होत्या. त्यात पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शहरातील संपूर्ण भाग घेण्यात आला. त्याचा प्रस्ताव तयार करताना शहरातील वाढीव भाग राहिल्याने आता नव्याने १६५ कॉलन्यांसाठी नव्याने अंदाजपत्रक तयार करून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे; तर भुयारी गटार योजना शहरात दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील ५५ टक्के भागातील काम हाती घेण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित काम हाती घेण्यात येणार आहे. मात्र हे काम पूर्ण करताना शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मलनिस्सारण प्रकल्प तयार करण्यात येतो. यासाठी महापालिका प्रशासनाला सुमारे १० एकर जागेची आवश्यकता आहे. मात्र शहर परिसरात अशी जागा नसल्याने भुयारी गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला अडचणी निर्माण झाल्या आहेत.
जागा असली तरी भूसंपादन करण्यासाठी निधीची आवश्यकता भासणार
पहिल्या टप्प्यातील कामासाठी शिवाजीनगर भागातील महापालिकेच्या जागेवर मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सद्य:स्थितीत सुरू आहे. या प्रकल्पाचे काम आतापर्यंत ७० टक्के पूर्ण झाले असून, शहरातील ५० टक्के सांडपाण्यावर या प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यातील मलनिस्सारण प्रकल्पासाठी महापालिकेकडे आवश्यक जागा उपलब्ध नाही. महापालिकेला या प्रकल्पासाठी इतर जागा संपादित करावी लागणार आहे. मात्र ही जागा संपादित करण्यासाठी महापालिकेकडे आवश्यक निधीची तरतूद अद्यापपर्यंत नाही. यामुळे शहरातील भुयारी गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील काम अजून प्रलंबित राहण्याची शक्यता आहे.
महापालिकेकडून प्रस्तावही तयार नाही
अमृत योजनेच्या कामांमुळे शहरातील रस्त्यांचे काम थांबली आहे. भुयारी व पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतरच शहरातील रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे. सप्टेंबरपर्यंत भुयारी व पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर शहरातील रस्त्याच्या कामांना सुरुवात होणार आहे. दरम्यान, शहरातील ४५ टक्के भागात भुयारी गटार योजनेचे काम अद्याप बाकी आहे. मलनिस्सारण प्रकल्पासाठी जागाच नसल्याने महापालिकेकडून दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी अद्यापदेखील प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत महापालिकेने शहरातील उर्वरित भागांमध्ये रस्त्यांचे काम पूर्ण केली. त्यानंतर पुन्हा भुयारी गटार योजनेचे काम सुरू झाले तर पुन्हा नवीन तयार करण्यात आलेले रस्ते फोडण्याची वेळ महापालिकेवर येईल; त्यामुळे महापालिका प्रशासनाने तत्काळ जागेचा शोध घेऊन दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठीदेखील प्रस्ताव तयार करून घ्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
कोट..
शहरातील भुयारी गटार योजनेचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी महापालिकेकडे अद्याप मलनिस्सारण प्रकल्पासाठी जागा उपलब्ध नाही. या जागेचा शोध घेऊन दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी प्रस्ताव तयार केला जाणार आहे.
- अरविंद भोसले, शहर अभियंता, महापालिका