जळगाव : पहिल्या लाटेच्या तुलनेत एप्रिल महिन्यात कोरोनाबाधित महिलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून, गेल्या दहा दिवसांत ९३ महिलांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण पुरुषांच्या मृत्यूच्या संख्येच्या अगदी जवळ आहे. सोमवारी तर तब्बल १५ महिलांचा मृत्यू नोंदविण्यात आला आहे.
पहिल्या लाटेत महिलांपेक्षा पुरुषांमधील मृत्यूचे प्रमाण कितीतरी अधिक होते. यंदाच्या या लाटेत मात्र हे चित्र वेगळे असून, कमी वयाच्या अनेक महिलांचा एप्रिल महिन्यात मृत्यू झाला आहे. यात वीस वर्षांपासून ते ९० वर्षांपर्यंतच्या महिलांच्या मृत्यूचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून एकत्रितच जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच दिवसांपासून दिवसाला सरासरी २० मृत्यू होत आहेत. यात निम्मे किंवा त्यापेक्षा अधिक महिलांचा समावेश असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून आहे.
गर्भवती महिला बाधित होण्याचे प्रमाणही या लाटेत अधिक असून, लहान बालकांनाही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. अनेक बालके यात गंभीरही झाली होती. त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला होता. गेल्या तीन महिन्यांत ६० गर्भवती महिला बाधित असल्याची आकडेवारी शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयातून समोर आली आहे. यात काही गर्भवती महिलांचा मृत्यू झाला आहे. महिला गंभीर होत असल्याचे प्रमाणही यंदाच्या लाटेत वाढले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. महिलांची प्रतिकारक्षमता कमी असणे हे त्यामागचे एक कारण सांगितले जात आहे.
गेल्या दहा दिवसांतील स्थिती
१० एप्रिल : १८ पैकी ८ महिला
११ एप्रिल : १७ पैकी ८ महिला
१२ एप्रिल : १६ पैकी ९ महिला
१३ एप्रिल : १८ पैकी ४ महिला
१४ एप्रिल : २१ पैकी : १० महिला
१५ एप्रिल : २० पैकी ८ महिला
१६ एप्रिल : २० पैकी १० महिला
१७ एप्रिल : २१ पैकी १२ महिला
१८ एप्रिल : २२ पैकी ९ महिला
१९ एप्रिल : २४ पैकी १५ महिला
एकूण १९७ मृत्यू
१०४ पुरुष
९३ महिला