लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : काही वर्षांमध्ये बदलत जाणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने फटका बसत आहे. खरीप हंगामात गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे केवळ ४० टक्के हंगाम होत आहे, तर रब्बी हंगामदेखील अवकाळी पावसामुळे वाया जाताना दिसून येत आहे. सलग दोन वर्षात अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ज्या शेतकऱ्यांचा माल निघाला ते शेतकरी भाग्यशाली समजले जात आहेत. शनिवारी जिल्ह्यातील चाळीसगाव, जळगाव, अमळनेर व जामनेर तालुक्यात गारपिटीसह झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला आहे.
निसर्गाच्या बदलत्या हवामानामुळे ऋतुमानाचे चक्र बदलले आहे. यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या पाचही महिन्यांमध्ये जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे रब्बीच्या हंगामात तब्बल वीस ते पंचवीस टक्के परिणाम होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातदेखील कापसाच्या उत्पादनात २५ टक्के घट झाली होती. तर सोयाबीन, उडीद व मूग या पिकांच्या उत्पादनात ६० ते ७० टक्के घट झाली होती. आता हाच फटका रब्बी हंगामातील पिकांना बसताना दिसून येत आहे.
अवकाळी पावसानंतर पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ
शनिवारी झालेल्या पावसानंतर अजून काही दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्यांनी रविवारी मिळेल त्या मजुरांद्वारे व ज्या भावात मिळेल त्या मशीनद्वारे गहू व दादर काढण्याचे काम सुरू केले होते. अनेक यंत्र चालकांनी दादर व गहू काढण्याच्या दरातही एक बिघ्यामागे पाचशे ते हजार रुपयांची वाढ केली होती. मात्र, पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने शेतातून वाचलेली पिके काढण्यासाठी लगबग केली होती.
अजून चार दिवस पावसाचा अंदाज
जिल्ह्यात २४ मार्चपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. नार्वेस्टर इफेक्टमुळे मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वादळी पावसासह काही भागात गारपिटीचा ही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच ४० ते ४५ किमी प्रतितास वेगाने जिल्ह्यात वारे वाहण्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
या भागात बसला सर्वाधिक फटका
शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे जळगाव तालुक्यातील म्हसावद, वडली, वावडदा, बिलवाडी, विटनेर या पट्ट्यासह आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी या गावांमध्येही अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच गिरणा व तापी नदीच्या मध्ये येणाऱ्या भागातील कठोरा, भादली, करंज या गावांमधील शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसल्याची माहिती या भागातील शेतकऱ्यांनी दिली आहे.
सलग दोन वर्ष शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा
गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अवकृपा दाखवली आहे. सन २०१९मध्ये खरीप हंगामादरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. त्यानंतर मार्च २०२०मध्येदेखील जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने चोपडा, जळगाव, यावल व अमळनेर या तालुक्यांमध्येही रब्बी हंगामाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासह २०२०मध्येही जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामाच्या उत्पादनात पन्नास टक्के घट झाली. आता पुन्हा अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाला मोठा फटका बसला आहे. यासह जळगाव तालुक्यातील गिरणा पट्ट्यातील केळी बागांचेही शनिवारी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.