जळगाव : प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वत:चे आरोग्य सुदृढ ठेवून स्वत:चे उपचार करण्याची मोठी शक्ती असते. प्राचीन ग्रंथांत शरीरातील चक्रांचा जो उल्लेख आहे त्या चक्रांना ऊर्जेद्वारा संतुलित ठेवून आपण सुखमय जीवन जगू शकतो, असे प्रतिपादन चेन्नई (थल्ली) येथील रमणाश्रमचे संस्थापक एन.जे. रेड्डी यांनी केले. जळगाव येथील जय गजानन एस्ट्रो वर्ल्ड व वेदचक्षू ग्लोबल, औरंगाबादच्या व्याख्यानात ते बोलत होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १ ऑगस्टपासून ही व्याख्यानमाला ऑनलाइन सुरू आहे. राजेश मंडोरे यांनी प्रास्ताविक केले. रमणाश्रमच्या एन. जननी, पी. एच.एच.टीम मुंबईच्या संस्थापिका व ट्रेनर सीए पूजा लढ्ढा यांनी यावेळी माहिती दिली. आत्म्याचे संतुलन योग प्राणविद्येच्या शिक्षणाद्वारेच होऊ शकते. आत्मा शुद्धतेसाठी शरीरातील ११ चक्रे हिलिंगद्वारे संतुलित असली तर जीवन सुखमय आहे. ही चक्रे साधनेने संतुलित कशी ठेवावीत, हेच शास्त्रोक्त गमक योग प्राणविद्या आपल्या शिक्षा व उपचारातून देते, असे रेड्डी यांनी या व्याख्यानात सांगितले. यावेळी डॉ. मंजू राठी, लीला डालिया, अभय लढ्ढा, उज्ज्वल पावले, नीता घोडावत, हेमाजी सारडा यांची उपस्थिती होती.